एकबोटेंची पोलिस कोठडी घेणार

0

अटकेबाबत विश्‍वास नांगरे-पाटील यांची भूमिका

पिंपरी-चिंचवड : कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी मिलिंद एकबोटेंना आधीच दिलासा मिळाला होता. त्याअनुषंगाने आम्हाला पोलिस कोठडी घेऊन, चौकशी करायची आहे. फक्त अटक करुन जामीन मिळू द्यायचा नाही. त्यामुळे आमची कोठडीची मागणी आहे. त्यानुसार 14 मार्चला ताकदीनिशी न्यायालयात बाजू मांडू, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी दिली. मिलिंद एकबोटेंना अटक का केली नाही, असा प्रश्‍न पत्रकारांना विचारला असता त्यांनी हे उत्तर दिले. ते रावेत येथे पत्रकारांशी बोलत होते.

सर्वोच्च न्यायालयात धिंडवडे
मंगळवारी मिलिंद एकबोटेंच्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारची बनवाबनवी सर्वोच्च न्यायालयात उघड झाली होती. एकबोटेंना आतापर्यंत का अटक केली नाही, या प्रश्‍नावर महाराष्ट्र सरकारने हास्यास्पद उत्तर दिले. एकबोटे आम्हाला सापडलेच नाहीत, सातत्याने गायब होते, या सरकारच्या दाव्याचा खुद्द एकबोटेंच्या वकिलांकडून इन्कार करण्यात आला. आम्ही पोलिसांकडे जायला तयार आहोत, त्यांना पूर्ण सहकार्य द्यायला तयार आहोत, तेच बोलवत नाहीत. या उत्तरामुळे महाराष्ट्र सरकारच्या एकबोटे बचाव धोरणाचे सर्वोच्च न्यायालयात धिंडवडे निघाले होते.

नेमके काय आहे प्रकरण?
सर्वोच्च न्यायालयाने मिलिंद एकबोटे यांचा अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर त्यांनी ग्रामीण पोलिसांना चार पत्रे पाठवून आपण चौकशीला तयार असल्याचे कळविले होते. परंतु, ग्रामीण पोलिसांनी त्यांना कोणताही प्रतिसाद दिला नाही किंवा त्यांना चौकशीलाही बोलविले नाही, असे मिलिंद एकबोटे यांचे वकील महिन प्रधान यांनी सांगितले आहे. कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारीला झालेल्या दंगलप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी एकबोटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तेथेही अर्ज फेटाळला गेल्यावर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले. सर्वोच्च न्यायालयाने 7 फेब्रुवारीला त्यांना अंतरिम जामीन मंजूर करून त्याची सुनावणी 20 फेब्रुवारीरोजी ठेवली होती. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी अंतिम सुनावणी 14 मार्चला ठेवली असून, तोपर्यंत त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे.