एकमेकांच्या तंगड्या खेचल्यास गावाचा खुंटेल विकास

0

वरणगाव येथे सत्यपाल महाराज : कीर्तनाला नागरीकांची अभूतपूर्व गर्दी

वरणगाव- अंधश्रद्धेकडे न वळता आपल्या कर्मावर चालत रहा, प्रगतीकडे चला, विकास तुमच्या मागे धावत जाईल मात्र कुणी विकास करीत असेल तर त्याच्या तंगड्या खेचू नका, असे केल्याने माझ्या माय बापांनो गावाचा विकास खुंटतो नंतर पश्‍चातापाची वेळ येते मात्र खरं जो काम करतो तो लोकांच्या लक्षात राहतो आणि जो तंगड्या ओढतो तोदेखील लक्षात राहतो मात्र त्याचा हिशेब जनता बरोबर पाच वर्षांनी देते, असे विचार ह.भ.प.सत्यपाल महाराज यांनी येथे व्यक्त केले. नगरपरीषदेच्या वतीने प्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस 15 सप्टेंबर ते महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर दरम्यान स्वच्छ भारत अभियान वरणगांव शहरात राबवण्यात आले. स्वछता पंधरवड्याचा समारोप राष्ट्रीय कीर्तनकार सत्यपाल महाराज यांच्या कीर्तनाने झाला. याप्रसंगी ते बोलत होते.

विकासकामांमुळे नगरपालिका ‘नंबर वन’
वरणगाव नगरपालिकेने नऊ महिन्यात 14 कोटींची कामे मार्गी लावण्यात यश मिळवले असून ही नगरपालिका जिल्ह्यात एक नंबरची नगरपालिका ठरली आहे. स्वच्छता अभियानात देशात 70 वा क्रमांक व जिल्ह्यात जामनेरनंतर दुसरा क्रमांक मिळवला हे पालिका कर्मचारी व वरणगावातील जनतेचे यश आहे, असे सत्यपाल महाराज म्हणाले.देशात नरेंद्र व राज्यात देवेंद्र व बरोबरीला मंत्री गिरीश भाऊ यांची जनहिताची कामे जोमात सुरू असल्याचा गौरवही त्यांनी कीर्तनातून केला.

यांची कीर्तनास होती उपस्थिती
नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, नगरसेविका माला मेढे, नगरसेवक राजेंद्र चौधरी, रवींद्र सोनवणे, विष्णू खोले, माजी उपसरपंच साजीद कुरेशी, कामगार नेते मिलिंद मेढे, समाजसेवक ईरफानभाई पिंजारी, नामदेव मोरे, ज्ञानेश्वर घाटोळे, पाणीपुरवठा अभियंता गणेश चाटे, कार्यालयीन अधीक्षक गंभीर कोळी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय माळी यांनी केले.