एकमेका साह्य करू …!!

0

भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. आपली भारतीय संस्कृती आपल्याला विश्‍वबंधुत्व, संघटनशक्ती, एकता, बंधुभाव, समता व या देशाची अखंडता कायम टिकवून ठेवण्याचे संस्कार करते. त्यामुळेच आपण विविध धर्माचे, जातीचे व पंथाचे लोक मोठ्या आनंदाने, प्रेमभावाने आनंदाने जीवन जगत असतो! म्हणूनच आपल्या भारत देशाला सोने की चिडियाँ म्हणून ओळखल्या जाते. मानवानी आपल्या बुद्धीच्या बळावर अनेक क्रांतिकारी बदल या सृष्टीवर घडवून आणले. रानटी अवस्थेतून तो आपली प्रगती करत आला. संघटन करून टोळ्यांनी राहणारा मानव आज आकाशात झेप घेऊ लागला. जे शक्य झाले ते संघटन शक्तीतूनच जसा जसा तो विकसित होत गेला तशीतशी त्याची कार्यक्षमता विकसित होत गेली व तो प्रगत होत गेला. म्हणूनच सरदार वल्लभभाई पटेल म्हणतात- Manpower without unity is not – strength unless…it is harmonised and united properly, then it becomes a spiritual power.

मानव हा भावनाप्रधान प्राणी असून, त्याला कायम आधाराची गरज असते आणि तो आधार मिळतो त्याला समाजातून! समाजात राहून एकमेकास साह्य करत, जो परोपकारी भावना जोपासतो, जो समाजासाठी, राष्ट्रनिर्माण करण्यास प्रामाणिकपणे झटतो तोच खरा मानव! जातीपातीचे गलिच्छ राजकारण, आरक्षणवाद, सीमावाद, असे किती तरी प्रश्‍न आपल्या देशातील अराजकतेचा नंगानाच घालत असताना आपण बघतच आहोत.

त्यासाठी आपण एकमेकांना मानवतेचा हात देणं गरजेचे आहे. सामाजिक ऋणत्व जर फेडायचे असेल तर निश्‍चितच आपल्याला एकमेकास साह्य करायला हवे! भुकेल्यास अन्न, पाणी तर निराधारास आधार द्यायला हवे! कायम दुसर्‍याची मदत करायला हवी! ती मदत एखाद्या व्यंग माणसाची मदत करून, कुणाचे ओझे हल्के करून, तर कुणाला मानसिक, भावनिक आधार देऊनही आपण करू शकतो. संघटन शक्तीद्वारे आपण गावातील रस्ते, पाटबंधारे, गरजू लोकांना शौचालये तर गावातील येणारी नवीन पिढी बौद्धिक व शारीरिकरीत्या सुदृढ व सशक्त करण्यास व्यायाम शाळाचे व वाचनालयाची स्थापना पण करू शकतो, तर पर्यावरण योग्य टिकवून ठेवण्यास झाडे लावण्याचा संघटित विचार करू शकतो, स्वच्छतेचा एकत्र संकल्प करू शकतो. समाजात जिथे अन्याय, अत्याचार होत असेल, तर नुसती बघ्याची भूमिका न ठेवता आपण त्या अन्यायावर संघटितपणे तुटून पडायला हवे!

Unity is strenghth….when there is team work and collaboration,wonderful things can be achive.आपण आपल्या देशाला इतर विकसित देशाच्या बरोबरीने आणू शकतो, महासत्तेचे स्वप्न जोपासू शकतो, पण त्यासाठी सव्वाशे करोड जनतेला एकत्र येण्याची गरज आहे. सुरुवातीपासूनच आपण यात मागे राहिले आहोत. म्हणूनच इथे मोगल, डच, फ्रेंच व इंग्रजांनी आपल्यावर कायम सत्ता गाजवली. पण जेव्हा जेव्हा देशात संघटन घडून आलं तेव्हा तेव्हा या देशात नवक्रांती घडून आली हेही तितकेच खरे! शिवाजी महाराजांनी मूठभर मावळ्यांच्या सोबतीने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, तर देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यास जेव्हा संघटन करून अनेक समाज क्रांतिकारी जेव्हा एकत्र आले तेव्हा त्यांनी इंग्रजांना सळोपळो करून सोडले, डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्य समजल्या जाणार्‍या समाजबांधवांना शिका, संघटित व्हा व संघर्ष करा! चा नारा देऊन संघटनाचे महत्त्व पटवून दिले. एवढी आमूलाग्र शक्ती संघटनशक्तीमध्ये आहे. एकमेकांच्या हातात हात देऊन आपण विश्‍वबंधुता जोपासू शकतो. म्हणूनच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संघटनशक्तीला महत्त्व देत असंख्य मानवजातीला सांगून जातात. या भारतात बंधुभाव नित्य असू दे! हे सर्वधर्म संप्रदाय एक असू दे. आज आपण पुन्हा एकदा समतेचे, बंधुतेचे, मानवतेचे हे हात एकमेकांच्या हातात देऊ व एकमेकांस साह्य करू हाच संकल्प करू या!

-प्रा. वैशाली देशमुख
7420850376