एकविरा देवस्थानचा कारभार चालणार संयुक्त स्वाक्षरीने!

0

पुणे धर्मादाय आयुक्तांचे आदेश

लोणावळा । कुलस्वामीनी आई एकविरा देवीच्या कार्ला गडावरील आर्थिक कारभार यापुढे चेंज रिपोर्ट क्र. 1634/2014 च्या शिल्लक मुदतीपर्यंत दोन गटातील विश्‍वस्तांच्या संयुक्त स्वाक्षरीने करण्यात यावा, असा आदेश पुणे धर्मादाय आयुक्तांनी दिला आहे. या आदेशानुसार देवस्थानचे अध्यक्ष यांच्या गटाच्या वतीने नवनाथ देशमुख व वेहेरगाव ग्रामस्थांतर्फे काळूराम देशमुख यांच्या संयुक्त स्वाक्षरीने आता यापुढे देवस्थान ट्रस्टचा आर्थिक कारभार करता येणार आहे.

विश्‍वस्त व ग्रामस्थांमध्ये वाद
काही महिन्यांपूर्वी कुलस्वामीनी एकविरा देवीच्या मंदिरावर असलेल्या कळसाची चोरी झाली होती. या चोरीवरून ग्रामस्थ व देवस्थान ट्रस्टचे विश्‍वस्त यांच्यात वादविवाद झाल्याने या चोरीला वेगळे वळण लागले होते. कळस चोरीला विश्‍वस्तांचा हलगर्जीपणाच जबाबदार असल्याचा आरोप करत वेहेरगाव ग्रामस्थांनी वेहेरगाव बंद, मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर कार्ला फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यानंतर वेहेरगाव ग्रामस्थांनी विद्यामान संचालक मंडळाला बाजुला करत परस्पर बैठक घेऊन नवीन अध्यक्ष व कार्यकारणी देखील जाहीर केली होती. याबाबत धर्मादाय आयुक्तांकडे दोन अपिल दाखल करण्यात आले होते. ग्रामस्थ व देवस्थान ट्रस्ट यांच्या वादात देवस्थानचा आर्थिक कारभार पुरता ठप्प झाल्याने कामगारांचे पगार, वीज बिल व इतर सर्व कामे रखडली होती. पगाराविना कामगार बेजार झाले होते.

नेमका कारभारी कोण?
देवस्थानच्या दोन कार्यकारण्या झाल्याने नेमका कारभारी कोण याबाबत नवा वाद निर्माण झाला होता. यासर्व बाबीचा विचार करता तसेच पुढील महिन्यात देवीची चैत्री यात्रा होणार असल्याने तक्रार क्र. 28 व 29 मधील काही मुद्दयांवर निर्णय देताना धर्मदाय आयुक्तांनी दोन्ही गटातील एक एक सदस्यांच्या सहीने आर्थिक कारभार करण्याचा निर्णय दिला आहे. हा कारभार चेंज रिपोर्ट क्र. 1634/2014 मध्ये दिलेल्या कालावधीपर्यंत असणार आहे.