भुसावळ : खुर्ची, पदापेक्षा देशाची सुरक्षा अधिक महत्त्वाची असून देश सुरक्षीत राहिला तर आपण सर्व सुरक्षीत राहू ही देशाची सुरक्षा केवळ भारतीय जनता पार्टी चांगल्या पध्दतीने करू शकते. मी भाजपा पक्ष सोडून राष्ट्रवादीत जाणार, अशा वल्गना मध्यंतरी करण्यात आल्या शिवाय मला राष्ट्रवादीकडून ऑफरदेखील आल्या मात्र आपण कदापि भाजप सोडणार नाही हवे तर एकवेळ निवडणूक लढणार नाही मात्र भाजपातच राहू, असे स्पष्ट मत आमदार संजय सावकारे यांनी व्यक्त केले. शहरातील सिंधी कॉलनीत प्रभाग 21 मध्ये सिंधी कॉलनी येथील रामभाऊ बेकरीपासून भक्त निवासपर्यंत पेव्हर ब्लॉक बसवण्याचा कामाचा शुभारंभ आमदारांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.
विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही
आमदार म्हणाले की, प्रभाग क्रमांक 21 मध्ये मोठ्या प्रमाणावर चांगली विकास कामे झाली आहेत. काही कामे बाकी असून ती सुद्धा लवकरच पूर्ण करू. प्रभागाला निधी कमी पडू देणार नाही, असेही ते म्हणाले. देशाच्या सुरक्षेसमोर पद, खुर्ची मोठी नाही. एकवेळ उमेदवारी नाही भेटली तरी चालेल पण भाजप सोडणार नाही कारण देशाच्या सुरक्षेसाठी भारतीय जनता पार्टी शिवाय पर्याय नाही, असेही आमदारांनी ठासून सांगितले.
यांची होती उपस्थिती
माजी नगरसेवक निकी बतरा व अजय नागराणी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष रमेश नागराणी, ज्ञानसेठ लेखवानी, सिरवाणी, त्रिलोक मनवानी, मनोहर सोढाई, राजकुमार वादवानी, सुनीलकुमार बसंतानी, मनोहरलाल तेजवणी, नारायणदास बठेजा आदींसह समाजबांधव उपस्थित होते.