दिग्दर्शक योगेश गोसावी यांचे मत
पिंपरी : एका लेखकाची कहाणी ‘सॉरी’ चित्रपटात दाखवण्यात आली आहे. आपण लिहिलेल समोरील व्यक्तीच्या मनात उतरवण्यासाठी किंवा इतरांसमोर मांडण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो, किती नकार पचवावे लागतात, त्यातूनही असाच काहीसा प्रवास ‘सॉरी’ चित्रपटात बघायला मिळणार आहे. सौरभ उर्फ सॉरी हा चित्रपटाचा नायक आहे. आपण प्रत्येकजण सॉरीचे आयुष्य आपल्या वैयक्तिक आयुष्यात कधी ना कधी जगतच असतो. चित्रपटगृहात आपल्याला आपल्यातला ‘सॉरी’ मिळणार आहे. त्यामुळे एकाच आयुष्यात आपल्याला अनेक आयुष्य जगण्याची कला समजणार आहे. तसेच मनातल्या आरशात झालेली स्वतःची ओळख म्हणजे सॉरी हा चित्रपट आहे, असे मराठी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि अभिनेते योगेश दत्तात्रय गोसावी यांनी व्यक्त केले. योगेश गोसावी दिग्दर्शित ‘सॉरी’ हा चित्रपट सध्या येऊ घातला आहे. यावेळी त्यांचा आगामी चित्रपट ‘सॉरी’ आणि मराठी चित्रपटाविषयी अभिनेते गोसावी बोलत होते.
नवीन देण्याचा प्रयत्न
योगेश गोसावी पुढे म्हणाले की, प्रत्येक दिग्दर्शक शासकीय अनुदान मिळण्यासाठी चित्रपट तयार करत नाही. चित्रपट हे अभिव्यक्तीचं माध्यम आहे. मनोरंजनासोबत प्रेक्षकांच्या ज्ञानातही भर घालण्याचा प्रयत्न चित्रपटात केला जातो. प्रत्येक वेळी काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न केला जातो. काहींचा हा प्रयत्न फसतो, तर काहींचा यशस्वी होतो. मराठीमध्ये चित्रपटांचे विषय नाविन्यपूर्ण आहेत. पण त्याच्या कलाकृती पडद्यावर तेवढ्या तोडीच्या येत नाहीत, अशी ओरड सध्या मराठी प्रेक्षकांमधून वारंवार होते. दरवर्षी मराठी चित्रपटसृष्टीत सुमारे 150 चित्रपट येतात. त्यामुळे यात व्यक्तिगत स्पर्धा आणि द्वंद्व वाढीस लागत आहे. याचा परिणाम म्हणून मराठी प्रेक्षक इतर भाषेकडे वळत आहे. यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी एकत्र येऊन काम करायला हवं. वर्षभरात मोजकेच चित्रपट आणावे, पण त्यातून दमदार कलाकृती प्रेक्षकांसमोर मांडाव्यात.
द्विअर्थी शब्द, गावंढळपणाचे अतिरंजित केलेले चित्र दाखवणे म्हणजे खरा चित्रपट नाही. तर कथेच्या मागणीनुसार दिलेला संवाद अधिक उपयुक्त ठरतो. आयटम साँगची नवीन प्रथा रूढ होत आहे. त्या प्रथेला कुठेतरी छेद देऊन जसं आहे तसं, दाखवायला हवे. सर्वांची कामाची व्यस्तता एवढी वाढली आहे, की त्यामुळे चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघायला देखील कुणाकडे वेळ नाही. त्यामुळे सोशल मीडिया हा सर्वात जवळचा आणि लवकर उपलब्ध होणारा पर्याय आहे. ‘सॉरी’ हा मराठीतला एकमेव चित्रपट आहे, जो 5 धार्मिक स्थळे, 7 राज्ये आणि 45 लोकेशन्सवर शूट करण्यात आला आहे, असेही गोसावी म्हणाले.
कामासोबत खूप शिकलो
‘सॉरी’ चा नायक सौरभ चिरमुला म्हणाला की, नुकतंच पदवी शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला आहे. अभिनय येत नसतानाही पण आपण काहीतरी वेगळं करू शकतो, अस सारख वाटायच. दिग्दर्शक गोसावी सर यांचा माझ्यावरील विश्वास आणि माझा माझ्यातील आत्मविश्वास असल्यामुळे पहिला चित्रपट मनापासून केला. चित्रपटातली प्रत्येक गोष्ट नवीन होती, त्यामुळे काम करण्यासोबत भरपूर शिकायलाही मिळालं. सिनेमाचे चित्रीकरण पिंपरी-चिंचवड मधील कॅमेरामन हर्षद मुजुमदार याने केले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडचा ग्लोबल अँगल या चित्रपटाला मिळणार आहे. हर्षद मागील आठ वर्षांपासून विविध चित्रपटांमध्ये छायाचित्रकार म्हणून काम करत आहे. सॉरी मधून तो प्रथमच सिनेमॅटोग्राफर म्हणून येत आहे.