वाकड : येथील एकाच सोसायटीमधील चार फ्लॅटमध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. ही घटना रविवारी (दि. 18) पहाटे तीन ते पाच वाजण्याच्या सुमारास विशालनगर येथील ऐश्वर्यम ग्रीन्स या सोसायटीत घडली. विश्वेश विजयकुमार देशमुख (वय 35, रा. वाकड) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विश्वेश आणि त्यांचा भाऊ विक्रम देशमुख दोघेही ऐश्वर्यम ग्रीन्स सोसायटीमध्ये राहतात. विक्रम देशमुख यांच्या फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचे लॅच तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश केला. फ्लॅटमधील वॉलड्रॉपमध्ये ठेवलेले रोख रक्कम आणि चांदीची भांडी असा एकूण 62 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. तसेच त्याच सोसायटीमध्ये आणखी तीन फ्लॅटमध्ये चोरीच्या घटना घडल्या आहेत. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून वाकड पोलीस तपास करीत आहेत.