नवी दिल्ली : आझाद हिंद सेनेला ७५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. ‘केवळ एका कुटुंबासाठी सरदार वल्लभभाई पटेल, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह नेताजी सुभाषचंद्र बोस यांचंही योगदान नाकारण्याचा प्रयत्न करण्यात आला’, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली आहे. स्वातंत्र्यानंतर सरदार पटेल किंवा सुभाषचंद्र बोस यांच्याकडे नेतृत्व गेलं असतं तर आजची परिस्थिती नक्कीच वेगळी असती, असंही मोदी यांनी म्हंटले.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या आझाद हिंद सेनेला ७५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. आझाद हिंद सरकार केवळ नावाची सरकार नव्हती. तर सुभाष बाबूंच्या नेतृत्वात या सरकारने अनेक महत्वाच्या योजना राबवल्या होत्या. त्यांची स्वत:ची बँक होती. त्यांचं स्वत:च चलन होतं, टपाल तिकीट होतं आणि गुप्तचर यंत्रणाही होती. अत्यंत अपुरी साधनं असतानाही त्यांनी इंग्रजांविरोधात लढा दिला, असे गौरवोद्गारही मोदी यांनी काढले. सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने पुरस्कार देण्याची घोषणाही यावेळी पंतप्रधान मोदी यांनी केली.