एका धाडसी सागर सफरीचा गौरव

0

आजच्या ग्लोबलायझेशनमुळे ‘हे विश्‍वची माझे घर’ या संकल्पनेतून जग फार जवळ आले आहे, उपलब्ध असलेला जागतिक पर्यटनाचा पर्याय लक्षात घेता प्रवासाची अभिरूची कळत-नकळत वाढत आहे, मग तो हवाईमार्गे सुलभ विमानाचा प्रवास असो वा समुद्रमार्गे क्रुझने केलेला प्रवास असो, अलीकडे तर आपला प्रवास अधिक सुखकर, आरामदयी, आनंदी होण्यासाठी सुमद्रातील अलिशान क्रुझने जगभ्रमंती करण्याकडे लोकांचा कल आहे. तर काहींना आपला प्रवास खडतर, संकटांना सामोरे जात, धाडसी असावा अशी मनोमन इच्छा असते. त्यातूनच अथांग समुद्राला गवसणी घालून अंगी असलेल्या धाडसाच्या बळावर एखादा एकांडी शिलेदार चक्क शिडाच्या जहाजातून जग प्रवास करतो यावर सहजासहजी कुणाचा विश्‍वास बसणार नाही, परंतु हे धाडस केले आहे निवृत्त कॅप्टन दिलीप दोंदे यांनी. फार कमी लोकांना ज्ञात असलेली परंतु अगदी बीर बाजीप्रभू देशपांडेंपासून सदैव शौर्य परंपरा जोपसणार्‍या सीकेपी ज्ञातीमधील दोंदे यांनी हे अचार साहस केले आहे.

इतिहासाच्या उजळणीत शौर्य आणि पराक्रमाला आलौकीक स्थान आहे, मग ती स्वातंत्र्यवीर सावरकरांची समुद्रातील धाडसी उडी असो वा अटकेपार भगवे निशाण फडकविण्याचा थोरले बाजीराव पेशव्यांचा पराक्रम असो, वा पराक्रमी शिवाजीराजांचा मोघलांविरुद्धचा लढा असो. अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा नावे कुणाला पुरस्कार देऊन गौरविण्यात येत असेल तर हा गौरव त्या पुरस्कार्थीसाठी अधिक प्रेरणादायी ठरतो, म्हणूनच बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या काही वर्षांत बाजीराव पेशवे यांच्या जन्मदिनाचे (दि.18 ऑगस्ट) औचित्य साधून परमवीर चक्र मिळालेले बाणासिंग, पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांना सन्मानित केले गेले आहे.

कॅप्टन दिलीप दोंदे यांनी 1986 साली राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रवेश केला. त्यानंतर ते नौसेनेमध्ये दाखल झाले. 19 ऑगस्ट, 2009 साली त्यांनी आपली धाडसी सागरी सफर सुरू केली. 19 मे, 2010पर्यंत मुंबई बंदरात येऊन ती जागतिक सफर पूर्ण केली. हिंदुस्थानी बनावटीच्या ‘महादयी’ नामक शिडाच्या जहाजातून सुमारे 42000 किलोमीटरचा इतका प्रचंड जग प्रवास केला. वेगवान बोचणारा वारा, समुद्राच्या लाटांतर आरूढ होऊन असंख्य संकटांना सामोरे जात संपूर्ण प्रवासात केवळ एका शेगडीची आणि समुद्राची साथ असा 157 दिवसांचा सागरी प्रवास म्हणजे प्रवाह विरुद्ध जाऊन धाडसी मराठी बाणा जोपसण्याचा एक आगळा-वेगळा आजपर्यंत कुणीही न केलेला प्रकार, कॅप्टन दोंदे यांनी केला. त्यांना येत्या रविवारी देण्यात येणारा ‘थोरले बाजीराव पेशवा पुरस्कार’ म्हणजे एका धाडसी सागर सफरीचा गौरव म्हणता येईल!
आनंद बेंद्रे, पुणे

शौर्य पुरस्काराचे मानकरी
बाजीराव पेशवे प्रतिष्ठानकडून दरवर्षी दिल्या जाणार्‍या थोरला बाजीराव पेशवा शौर्य पुरस्काराने सागरी सफर करणारे निवृत्त कॅप्टन दिलिप दोंदे यांना गौरविण्यात येत आहे. रविवारी एका समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने या धाडसी पुरस्कारार्थीची यशोगाथा…