एक कोटींची थकबाकी : भुसावळ पालिकेने थकबाकीअभावी 18 गाळ्यांना ठोकले सील

भुसावळ : मार्च एण्ड जवळ येताच पालिकेने थकबाकी वसुलीस वेग दिला आहे तर भुसावळातील तब्बल 18 गाळ्यांना शुक्रवारी पालिकेने सील लावल्याने थकबाकीदारांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, एकाच दिवसात तब्बल साडेआठ लाखांची वसुली करण्यात आली असून एकूण 400 गाळेधारकांवर कारवाई केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

80 लाखाहून अधिक थकबाकी
भुसावळ पालिकेचे शहरात एक हजार 235 गाळे असून यापोटी दरवर्षी सुमारे 40 लाखांपर्यंत उत्पन्न मिळते. गेल्या अनेक वर्षांपासून थकबाकी वाढत असल्याने चालू व मागील थकबाकी मिळून 80 लाखांपेक्षा अधिक वसूलीचे उद्दिष्ट असल्याने धडक मोहिमेला शुक्रवारपासून प्रारंभ करण्यात आला. जळगाव रोडवरील संकुलातील नऊ, तार ऑफीस रोड संकुलातील तीन तर डेली मार्केट भागातील संकूलांमधील सहा अशा एकूण 18 थकबाकीदारांचे गाळ सील करण्यात आले. काही गाळेधारकांनी थकबाकी भरल्यामुळे गाळे सील करण्याची कारवाई थांबली. दरम्यान शहरातील छत्रपती शिवाजी महाराज संकूल, दिनदयाळनगर संकूल, कपडा मार्केट, चुडी मार्केट, डी.एस. हायस्कूल म्युनिसीपल मार्केट आदींसह अन्य संकूलांतील थकीत गाळेधारकांवर कारवाई केली जाणार आहे. मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेचे करनिर्धारण अधिकारी चेतन पाटील, करअधिक्षक परवेज शेख, वैभव पवार, गोपाळ पाली, अनिल भाकरे, राजु चौधरी, जय पिंजाणी, अभय विणेवाले आदी कर्मचार्‍यांनी कारवाई केली.