भुसावळ । येथील प्रभाकर हॉलमध्ये सुरु असलेल्या कान्हदेश संगीत संमेलनाच्या तृतीय सत्रात पं. हेमंत पेंडसे यांच्या सध्या देशभर गाजत असलेला ‘एक राधा एक मीरा’ हा संत मीराबाई यांच्या रचनांचा भक्तिसंगितामुळे उपस्थित श्रोेतेे मंत्रमुग्ध झाले. पं. पेंडसे यांनी शेवटच्या सत्रात मीराबाईंच्या अभंगांचे उत्कृष्ट असे सादरीकरण केले. त्यामुळे त्यांचा हा कार्यक्रम भुसावळकर श्रोत्यांना एक अविस्मरणीय असाच ठरला आहे. या संगीत संमेलनाचा समारोप ध्वजाच्या अवतरणाने करण्यात आला. भुसावळ शहरात गेल्या 25 वर्षांनंतर प्रथमच दोनदिवसीय संगीत संमेलन भरविण्यात आले होते. यात राज्यभरातील ज्येष्ठ कलाकार सहभागी झाले होते.
शास्त्रीय व उपशास्त्रीय मैफिल
दुसर्या दिवसाच्या प्रथम सत्रात संमेलन अध्यक्ष मुंबई येथून आलेले पं. चंद्रशेखर वझे यांचे गायनातील सौंदर्यस्थळे यावर मार्गदर्शन सत्र झाले. तसेच शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन मैफिलीचा कार्यक्रम संपन्न झाला. यात प्रारंभी राग तोडीने मैफिलीला सुरुवात करण्यात आली होती.
गोविंदवार यांनी घेतली मुलाखत
दुपारच्या दुसर्या सत्रात पं. हेमंत पेंडसे व पं. चंद्रशेखर वझे यांची ‘स्वर प्रांतातील प्रवास’ या शिर्षकाची मुलाखत जळगावचे प्रथितयश मुलाखतकार मनोज गोविंदवार यांनी घेतलेली मुलाखत अविस्मरणीय अशीच ठरली. तृतीय सत्रात पं. हेमंत पेंडसे यांचा संत मीराबाईंच्या भजनांचा कार्यक्रम झाला.
श्रोत्यांचा लाभला प्रतिसाद
या दोनदिवसीय चाललेल्या कान्हदेश संगीत संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष दिपक अडावदकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. उत्कर्षा साठे, प्रविण ओहोळ, मनोज कुळकर्णी, शिरीष जोशी, योगेश साळशिंगीवार, किरण सोहळे, तेजस मराठे, गजानन कुळकर्णी, डॉ. दिलीप देशमुख, रघुनाथ मांडाळकर आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास श्रोत्यांचा प्रतिसाद लाभला.