जेमतेम दोन आठवड्यांपूर्वी त्यांच्या सायनच्या घरी झालेली भेट आणि त्यांनी मारलेल्या गप्पामधील अगदी शब्द अन् शब्द आठवतोय. त्यांनी आवर्जून सही करून दिलेला विसाव्या शतकातील महान व्यक्तिमत्त्वांच्या मुलाखतीचा दुर्मीळ ग्रंथ आणि त्याचा इतिहास सांगताना फुलून आलेला त्यांचा चेहरा आठवतोय आणि त्याहीपेक्षा आठवतोय 26 वर्षांपूर्वीचा त्यांच्या भेटीचा पहिला दिवस. पत्रकारितेत येण्यासाठी धडपडणार्या माझ्यासारख्या गाव-खेड्यातील मुलाला त्यांनी संपादक राधाकृष्ण नार्वेकर यांच्यापर्यंत पोहोचवले. पत्रकारितेवर आणि मनस्वी पत्रकारांवर मनापासून प्रेम करणारे ज्येष्ठ संपादक सोमनाथ पाटील यांचे निधन हा मराठी पत्रकारितेसाठी फार मोठा धक्का आहे. खासकरून आज जेव्हा पत्रकारितेचे वेगाने व्यावसायिकरण होत आहे, वृत्तपत्र हे साबण किंवा लोशनप्रमाणे एक उत्पादन, प्रॉडक्ट बनले किंवा बनवले आहे, त्याकाळात बड्या सरकारी नोकरीला, पर्यायाने आलिशान जीवनशैलीला लाथ मारून पत्रकारितेचा वसा घेणारे दुर्मीळ आहेत.
पाटीलसाहेबांच्या बोलण्यातून नेहमी त्यांचे धुळे जिल्ह्यातील गोताणे गाव, शासकीय विद्यानिकेतनातील दिवस, रशियातील शिक्षणाचा काळ आणि सरकारी नोकरीतील उच्च पदावरील आठवणी ऐकत ऐकत माझ्यासारखे अनेक पत्रकार मोठे झाले. त्यांचा स्वभाव अगदी मस्त, बिनधास्त. उगाच कुठला आव नाही आणि आपण सर्वज्ञ असल्याचा भाव नाही. मला ते नेहमीच जवळचे वाटायचे कारण त्यांच्या बोलण्यात ग्रामीण भागातील लोकांच्या स्वभावाप्रमाणे मोकळेपणा असायचा, त्यामुळे त्यांच्याशी बोलताना मनावर कधी ताण येत नसे. गेल्या अनेक वर्षांपासून पाटीलसाहेब पुण्यनगरी वर्तमानपत्रात लोकप्रिय सदर लिहायचे. त्यांची वेगळी दृष्टी, ओघवती भाषा, पत्रकारितेला वाहून घेणं, त्याचसोबत त्यांचं व्यवस्थापन कौशल्य यामुळे मीडियामध्ये त्याचं व्यक्तिमत्त्व नेहमीच आदरणीय ठरलं. ते खूप चांगले लेखक होते. त्यांचं ’अर्बन महाराष्ट्र-अॅन ओव्हरव्ह्यू’ हे पुस्तक अभ्यासकांसाठी खूपच महत्त्वाचं ठरलंय. या पुस्तकात महाराष्ट्रातलं शहरीकरण आणि राज्यांतल्या पालिकांचा इतिहास सांगितलाय. अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये हे पुस्तक अभ्यासाला होतं. त्यांनी आणखी पाच पुस्तकं लिहिली. त्यातल्या ‘तिसरी मुंबई’ या पुस्तकात समकालीन शहरी इतिहास, मुंबई आणि शेजारी शहरांच्या अडचणी मांडल्या होत्या. सोमनाथ पाटील यांचं व्यक्तिमत्त्व बहुआयामी होतं. जन्माने ते खान्देशी होते. त्यांनी त्यांचं शिक्षण उत्तर महाराष्ट्रात पूर्ण केलं. पण आयुष्यातला जास्त काळ पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईत काढला. त्यांचं रशियन भाषेवर प्रभुत्व होतं. सरकारी नोकरीतील राजकारण्यांचा हस्तक्षेप त्यांच्या पचनी पडत नव्हता. त्यांच्यातील पत्रकार त्यांना बाणेदारपणाचे सतत स्मरण देत होता. त्यात पत्रकारितेशिवाय त्यांना चैन पडेना. शेवटी त्यांनी मोठ्या पदावरील नोकरीचा राजीनामा दिला आणि पुन्हा ‘सकाळ’मध्ये रुजू झाले. त्यांचे हे पत्रकारितेवरील प्रेम अखेरपर्यंत कायम होते. पत्रकारितेवरच्या प्रेमानेच आजारपणातही ते सतर्क, प्रसन्न असायचे.पाटीलसर हे पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होते. त्यांच्याकडून भरपूर शिकण्यासारखं होतं. त्यांची शैक्षणिक संस्थांमध्ये महत्त्वाची भूमिका असायची. ते मुंबई पत्रकार संघाच्या पत्रकार अभ्यास वर्गाचे अधिष्ठाता होते. अनेक पत्रकारिता महाविद्यालयात ते अतिथी व्याख्याते होते.
त्यांनी हाँगकाँगचा हॅण्डओव्हर इव्हेंट कव्हर केला होता. ते पत्रकारितेतलं एक मानाचं पान. त्यामुळेच त्यांना प्रतिष्ठेता नाथ पै पुरस्कार मिळाला होता. आयुष्यभर ते अनेक सामाजिक-शैक्षणिक कार्यात व्यस्त राहिले. सोमनाथ पाटील यांना बरेच पुरस्कार मिळाले, मानसन्मान मिळाला, पण त्यांच्या जीवनात त्यांनी जपलं ते माणूसपण. मराठीत ते सही करताना फक्त सो.पा. असे दोनच शब्द लिहायचे. आताच्या कठीण काळात असा ’सोपा’ माणूस पुन्हा मिळणार नाही. पाटीलसाहेबांच्या मागे त्यांची पत्नी आणि सुविद्य कन्या डॉ. अनिता, जावई डॉ. भारत आहेत. त्यांना हा आघात सोसण्याचे बळ मिळो, एवढीचं प्रार्थना.
– महेश म्हात्रे
कार्यकारी संपादक, न्यूज 18 लोकमत
9870303430