पिंपरी : नियमानुसार सर्व देयक रक्कम देऊन क्रेडीट कार्ड बंद केल्यानंतरही एचडीएफसी बँकेकडून निगडी प्राधिकरण येथील एका ग्राहकाला वारंवार पैसे भरण्यासाठी सांगितले जात होते. त्यासाठी बचत खात्यातील रक्कमही परस्पर खात्यातून काढून घेण्यात आली होती. बँकेच्या या मनमानी कारभाराबद्दल पोलीस व रिझर्व्ह बँकेकडे ग्राहकाने तक्रार करताच आरबीआयने तक्रारीची दखल घेत कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिले आहे.
ग्राहक निगडी प्राधीकरणातील
निगडी प्राधिकरण येथील रहिवासी रणजीत इंगळे यांनी त्यांचे एचडीएफसी बँकेचे क्रेडीट कार्ड 2016 मध्ये बंद केले. त्यासाठी लागणारी रक्कम धनादेशाद्वारे बँकेत जमा केली. मात्र, त्यानंतरही इंगळे यांना त्यांच्या मोबाईलवर वेळोवेळी बँकेकडून पैसे भरण्यासाठी विचारणा केली जाऊ लागली. यावर इंगळे यांनी बँकेत जाऊन आपण रक्कम भरले असल्याचे सांगितले मात्र तरीही बँकेने इंगळे यांचे एचएडीएफसी बँकेतील बचत खात्यातून बँकेने परस्पर आठ हजार रुपये रोखून धरत ते पुढे काढून घेतले.
बँकेने दिला नव्हता प्रतिसाद
याप्रकरणी इंगळे यांनी बँकेच्या व्यवस्थापकाकडेही तक्रार केली. त्यांना मेल केले मात्र कोणतेही प्रतिक्रिया न देता परस्पर तक्रार निकाली काढल्याचे बँकेने एसएमएसद्वारे सांगितले. यावेळी इंगळे यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ल यांना आपल्या सोबत झालेल्या फसवणुकीची माहिती निवेदनाद्वारे दिली. तेच निवेदन पुढे इंगळे यांनी थेट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला दिले. इंगळे यांच्या तक्रारीची दखल घेत आरबीआयने इंगळे यांचे जागरूकपणे तक्रार केल्याबद्दल अभिनंदन केले असून त्यांच्या तक्रारीचे कायदेशीर पद्धतीने निवारण केले जाईल व त्याची माहितीही त्यांना दिले जाईल असे आश्वासनही दिले. त्यामुळे या एका तक्रारीमुळे खासगी बँकांच्या मनमानी काराभाराला आळा बसेल असे मत इंगळे यांनी व्यक्त केले आहे.