मुंबई:अंधेरीमध्ये एटीएम सेंटर फोडणाऱ्या एका तरुणाला साकीनाका पोलिसांनी रविवारी रंगेहाथ अटक केली. राजू बंगेरा (२३) असे या तरुणाचे नाव असून एका सतर्क फुलवाल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.
साकीनाकामधील जंगलेश्वर महादेव मंदिर मार्गावरील एका एटीएम सेंटरमध्ये रविवारी पहाटे राजू पैसे काढण्यासाठी आत शिरला. बराच वेळ झाला तरी तो बाहेर येत नव्हता. याचवेळी येथून जाणाऱ्या फुलवाल्याची नजर राजूवर पडली. राजूच्या संशयास्पद हालचाली पाहून फुलवाल्याने याबाबतची माहिती साकीनाका पोलिसांना दिली.
साकीनाका पोलिसांचे पथक तत्काळ या एटीएम सेंटरजवळ जाऊन पोहोचले. पोलिस बाहेर सापळा लावून बसलेत याची काहीच खबर राजू याला लागली नाही. राजू नशेमध्ये चारही बाजूने एटीएम मशीन फोडण्यात मग्न होता. बराच उशीर तो बाहेर येत नसल्याने अखेर पोलिस आत शिरले आणि त्याला ताब्यात घेतले. राजू अंधेरीच्या संघर्ष नगरमध्ये राहत असून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा तपास सुरू असल्याचे साकीनाका पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी संबंधित बँकेकडून एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही फुटेज मागविण्यात आले असल्याचेही पोलिसांनी सांगितले.