भुसावळातील इंडियन ओव्हरसीज बँकेच्या एटीएममधील प्रकार ; चोरट्यांची छवी सीसीटीव्हीत कैद ; वर्षभरापूर्वीही जिल्ह्यात तीन ठिकाणी फुटले एटीएम
भुसावळ- शहरातील वर्दळीच्या जामनेर रस्त्यावरील नवशक्ती आर्केडमधील इंडियन ओव्हरसीज बँकेचे एटीएम फोडण्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आल्याने बँकींग क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी पैसे टाकण्याच्या कॅश ट्रेला ड्रिल केले मात्र सुदैवाने कॅश ट्रे न उघडल्याने तब्बल आठ लाख 54 हजार 500 रुपयांची रक्कम सुरक्षित राहिली अन्यथा बँकेला मोठा फटका बसला असता. चोरट्यांनी बिंग फुटू नये म्हणून एटीएमचे शटर लावून घेतल्याने चोरी होत असल्याबाबत कुणालाही संशय आला नाही तर एक चोरट्याने रस्त्यावर येणार्या-जाणार्यांवर लक्ष ठेवल्याची बाब सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
शनिवारी सकाळी उघडकीस आली घटना
नवशक्ती आर्केडमध्ये इंडियन ओव्हरसीज बँकेचे एटीएम असून शेजारीच बँकेची शाखा आहे. शनिवारी सकाळी 10 वाजता श्री लक्ष्मी ट्रॅव्हल्सचे नितीन वायकोळे यांना एटीएमबाबत संशय आल्याने त्यांनी बँकेला माहिती दिल्यानंतर बँकेच्या अधिकार्यांनी शटर उचकावून पाहिल्यानंतर एटीएम फोडण्याचा प्रकार झाल्याची घटना उघडकीस आली. बाजारपेठ पोलिसांना घटना कळवण्यात आल्यानंतर उपनिरीक्षक निशीकांत जोशी, उपनिरीक्षक अनिस शेख, एएसआय अंबादास पाथरवट, प्रशांत चव्हाण, बापूराव बडगुजर, मिलिंद कंक, निलेश बाविस्कर, दीपक जाधव3 आदींनी धाव घेत पाहणी केली. शाखाधिकारी बँकेचे उपशाखा व्यवस्थापक प्रभात कुमार, आशिषकुमार आनंदलाल सोनडिया तसेच एजीएस कंपनीचे गौरव शिंदे यांनी एटीएमची पाहणी केली.
तर साडेआठ लाखांचा बँकेला बसता असता फटका
13 रोजी इंडियन ओव्हरसीज बँकेच्या एटीएममध्ये बँकेने आठ लाख 73 हजार 300 रुपयांची रोकड भरली होती तर 14 रोजी दिवसभरात 18 हजार 800 रुपये विड्राल करण्यात आल्याने आठ लाख 54 हजार 500 रुपयांची रोकड शिल्लक होती. सुदैवाने चोरट्यांना कॅश ट्रे उघडण्यात यश न आल्याने ही रक्कम वाचली अन्यथा बँकेला मोठा आर्थिक फटका बसला असता.
तीन चोरट्यांची छवी सीसीटीव्हीत कैद
बँकेच्या एटीएममध्ये असलेल्या सीसीटीव्हीत तीन चोरट्यांची छवी कैद झाली आहे. त्यातील दोन चोरट्यांनी तोंडाला मास्क बांधून सुरुवातीला रोकड भरण्यासाठी असलेल्या कप्प्याचा दरवाजा तोडून तसेच रोकड भरण्यापूर्वी पीन नंबर टाकण्यासाठी वापरण्यात येणारा की बोर्ड बाहेर काढून त्या जागेवर ड्रील मशिनने ड्रील केल्याचे उघड झाले आहे मात्र चोरट्यांच्या प्रयत्नात कॅश ट्रे बाहेर न आल्याने चोरट्यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेले. विशेष म्हणजे चोरट्यांनी चोरीची घटना कुणालाही न कळण्यासाठी एटीएमचे शटर लावून घेतले तर एका सहकार्याला रस्त्यावर पाळत ठेवण्यासाठी तैनात करण्यात आले त्यामुळे रस्त्यावरून तुरळक रहदारी असलीतरी कुणालाही चोरी होत असल्याचा संशय आला नाही तसेच बाजारपेठ पोलिसांनी पहाटे या मार्गावरून गस्त घातली मात्र त्यांनाही संशय आला नाही.
श्वान पथकाने दाखवला माग, तज्ज्ञांनी घेतले ठसे
चोरट्यांच्या शोधासाठी जळगाव येथील श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. श्वानाने जामनेर रोडपर्यंत चोरट्यांचा माग दाखवला तर तज्ज्ञांनी एटीएमला आरोपींचे हात लागल्याने त्याचे ठसे टिपण्याचा प्रयत्न केला. रविवारी दुपारपर्यंत याबाबतचा अहवाल प्राप्त होणार असून त्यानंतर हे ठसे रेकॉर्डवरील आरोपींच्या ठशांची मिळवून त्यांचा शोध घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सुरक्षा रक्षकांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
भुसावळातील 90 टक्के बँकांवर सुरक्षा रक्षकांचा अभाव आहे. दिवसा तर सोडाच रात्रीदेखील सुरक्षा रक्षक नेमण्यासंदर्भात बँक प्रशासनाने उदासीनता दाखवली आहे. गतवर्षी झालेल्या चोरीनंतर पोलिस प्रशासनाने बँक अधिकार्यांची बैठक घेवून सुरक्षा नेमण्याच्या सूचना केल्या मात्र नेहमीप्रमाणे कानाडोळा करण्यात आल्याने ही बाब चोरट्यांच्या पथ्यावर पडू पाहत आहेत.
वर्षभरापूर्वीही चोरट्यांनी जिल्ह्यात फोडले होते एटीएम
रविवार, 14 जानेवारी 18 रोजी भुसावळातील पंचमुखी हनुमान मंदिरासमोरील गुणवंत कॉम्प्लेक्समधील अॅक्सीस बँकेच्या एटीएममधून चोरट्यांनी तीन लाख 14 हजार 100 रुपयांची रोकड लांबवली होती तर सीसीटीव्हीच्या वायर्स कट करून कॅमेर्याची दिशा बदलण्यात आली तसेच गॅस कटरने कॅश ट्रे अलगदपणे लांबवण्यात आला व ही चोरी करण्यासाठी म्युन्सीपल पार्कमधील रहिवासी महेश साळी (सावरकर रोड, भुसावळ) यांच्या मालकीची चारचाकी (एम.एच.19 क्यू.6365) या गुन्ह्यात वापरण्यात आली तर या नंतर चोरट्यांनी यावल तालुक्यातील किनगावच्या टाटा इंडिकॅश कंपनीच्या एटीएममधून गॅस कटरच्या सहाय्याने कॅश ट्रे मधून 75 हजारांची रोकड लांबवून चोरटे चोपडा तालुक्यात धानोर्यात धडकले. गावातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून तीन लाख 63 हजार 100 रुपये लांबवून चोरटे बडोद्याकडे पसार झाले होते. तीनही ठिकाणच्या घटनांमध्ये 14 लाख 82 हजारांची रोकड लांबवण्यात आली होती तसेच चोरट्यांनी बडोदा शहरातील अजवा रोडवरील एसबीआयच्या एटीएममधून चोरट्यांनी 13.88 लाख तर थारसली क्षेत्रातील एटीएममधून 94 हजारांची रोकड लांबवली होती शिवाय अन्य चार एटीएमही फोडले मात्र त्यात रोकड नसल्याची बाब उघड झाली होती. या सर्व घटनेतील चोरटे एकच असल्याचा संशय आहे. वर्षभरानंतरही या गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिस यंत्रणेला यश आलेले नाही शिवाय 20 नोव्हेंबर 2017 रोजी भुसावळ-जळगाव मार्गावरील असोदा फाट्यावरील एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी सुरक्षा रक्षकाचे हातपाय बांधूत तब्बल सहा लाखांची रोकड लांबवणार्या चोरट्यांचा शोध लावण्यात अद्यापही पोलिसांना यश आलेले नाही हेदेखील विशेष !