चाकण । चाकणमधील महिंद्रा व्हेईकॅल मॅन्युफॅक्चरर्स लि. व यश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण खेड तालुक्यामध्ये एड्स जनजागृती व पुनर्वसन कार्यक्रम राबविला जात असून याचाच एक भाग म्हणून होळीचा कार्यक्रम राबविण्यात आला. यश फाउंडेशनच्या कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते फुले व रंग उधळून एच.आय.व्ही. सहजीवन जगणार्या बालगोपाळ व पालकांसोबत इको फ्रेंडली होळी साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र पाटील यांनी केले.
यामध्ये 220 हून अधिक पालक व मुलांनी सहभाग घेतला होता. सनी लोपेज, संतोष उनवणे, सयाजी देसाई, हरी सूर्यवंशी, निलेश नाईकवाडी याप्रसंगी उपस्थित होते. आम्ही आतापर्यंत खूप होळीचा सण साजरा केला पण असा आगळा वेगळा होळीचा सण पहिला नव्हता. या एच.आय.व्ही. ग्रस्त बालगोपाळांसोबत होळी साजरी करण्याचा वेगळाच आनंद आम्हाला लुटता आला, असे संतोष उनवणे यांनी यावेळी बोलताना सांगितले.