एनआरसीच्या मुद्द्यावरून कोणत्याही भारतीयाला देश सोडावा लागणार नाही-मोदी

0

नवी दिल्ली- देशात सद्यस्थितीत एनआरसीचा मुद्दा अधिक चर्चेत आहे. एनआरसीच्या मुद्द्यावरून विरोधक सरकारला लक्ष करीत आहेत. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाष्य केले आहे. एनआरसीच्या मुद्द्यावरुन कोणत्याही भारतीयाला देश सोडावा लागणार नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले आहे.

वादग्रस्त आणि चर्चेत राहिलेल्या विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाष्य केले आहे. आरक्षण, एनआरसी आणि जमावाकडून मारहाणीच्या घटना या बाबतचा उल्लेख केला आहे. जातनिहाय आरक्षणात कोणताही बदल करण्याचा सरकारचा विचार नाही. त्यामुळे याबाबत कोणीही मनात शंका ठेऊ नये. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची स्वप्ने हीच देशाची ताकद आहे. सबका साथ, सबका विकास या आमच्या उद्देशानुसार आंबेडकरांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. याद्वारे देशातील गरीब, पीडित, मागास, आदिवासी, दलित आणि ओबीसी समाजाचे हित जपणे आमच्यासाठी गरजेचे आहे.

मारहाणीच्या घटना दुर्दैवी
देशात सध्या जमावाकडून मारहाणीच्या ज्या घटना घडत आहेत त्या अत्यंत दुर्देवी आहेत. यावरुन कोणीही राजकारण करु नये सर्वांनी राजकारणाच्या पलिकडे जाऊन समाजात शांतता निर्माण करणे आवश्यक आहे. अशा मारहाणीच्या घटनांचे समर्थन होऊ शकत नाही, अशा शब्दांत मोदींनी आपली भुमिका स्पष्ट केली.

आसामच्या राष्ट्रीय नागरिक नोंदणीबाबत (एनआरसी) बोलताना मोदी म्हणाले, ज्या नागरिकांची नावे या यादीत नाहीत, त्यांना आपले नागरिकत्व सिद्ध करण्याची पूर्ण संधी दिली जाईल. त्यामुळे कोणत्याही भारतीय नागरिकाला देश सोडावा लागणार नाही. या मुद्द्यावरुन मोदींवर टीका करणाऱ्या ममता बॅनर्जींना उत्तर देताना ते म्हणाले, ज्या लोकांचा स्वतःवर विश्वास नाही, देशातील महत्वाच्या संस्थांवर त्यांना विश्वास नाही असेच लोक देशाचे तुकडे करण्याची भाषा करतात.

देशातील बेरोजगारीच्या मुद्द्यावर बोलताना मोदी म्हणाले, गेल्या वर्षी १ कोटी तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. हे सांगताना त्यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा दाखला दिला आणि या योजनांमुळे रोजगार निर्माण झाले नाहीत का? असा सवाल त्यांनी या मुद्द्यावरुन वारंवार टार्गेट करणाऱ्या विरोधकांना विचारला आहे.

महाआघाडी टिकणार नाही
दरम्यान, भाजपाला पराभूत करणे या एकमेव उद्देशाने तयार झालेली महाआघाडी फार काळ टिकू शकणार नाही, असेही मोदी यावेळी म्हणाले. ही महाआघाडी निवडणुकीआधी तुटते की नंतर हे पहावे लागणार आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी नव्हे तर व्यक्तिगत स्वार्थासाठी ही महाआघाडीची स्थापना करण्यात आल्याचा आरोप करताना विरोधकांना भाजपाशी एकट्याने लढण्याची हिंमत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.