एनसीसी अधिकाऱ्यांना घसघशीत मानधनवाढ!

0

अधिकाऱ्यांच्या दर्जा वेतनात दुप्पट वाढ, छात्रसैनिकांच्या भत्त्यातदेखील सुधारणा

मुंबई (निलेश झालटे):- भारतातील देशांतर्गत असुरक्षिततेप्रसंगी नागरी संरक्षण व नागरी सेवकासाठी मोलाचे कार्य करणारी राष्ट्रीय छात्र सेना अर्थात एनसीसीच्या अंशकालीन अधिकाऱ्यांना व छात्रसैनिकांना दुप्पट सध्याच्या मानधनाच्या दुप्पट मानधन देण्याचा शासन निर्णय घोषित करण्यात आला आहे. अंशकालीन अधिकाऱ्यांच्या दर्जा वेतनात वाढ करावी अशी मागणी अनेक दिवसापासून करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर अंशकालीन दर्जा वेतन, अंशकालीन अधिकारी मानधन, दैनिक भत्ता, वार्षिक प्रशिक्षण, काळजीवाहू भत्ता, पेट्रोल भत्ता व आउटफिट मेंटेनन्स भत्त्यांच्या दरात केंद्रसरकारने वाढ केल्याप्रमाणे राज्यातही सुधारित मानधन देण्याबाबत सांगितले आहे. अधिकाऱ्यांसोबत छात्र सैनिकांना दिला जाणारा दैनंदिन भत्ता तसेच वार्षिक प्रशिक्षण खर्च, भोजन भत्त्यामध्ये देखील घसघशीत वाढ करण्यात आली आहे. काही भत्त्याचा हिस्सा केंद्राचा तर काही हिस्सा राज्य सरकारकडून दिला जाणार आहे. काही विशेष भत्ते राज्यसरकारकडून देण्यात येणार आहेत.

अंशकालीन अधिकाऱ्यांचे दर्जावेतनात सध्याच्या वेतनापेक्षा सरसकट दुप्पट वाढ केली आहे. मेजर, कॅप्टन, लेफ्टनंट, चीफ ऑफिसर, फर्स्ट ऑफिसर, सेकंड ऑफिसर, थर्ड ऑफिसरच्या वेतनात सरसकट दुप्पट वाढ केली आहे. अंशकालीन अधिकाऱ्यांच्या मानधनात देखील जवळपास दीड पट वाढ केली आहे. तसेच अंशकालीन अधिकारी व छात्रसैनिकांना दिला जाणारा दैनिक भत्ता अनुक्रमे ३५ व ३० रुपयांवरून वाढवून १३० व १२५ रुपये करण्यात आला आहे. यामध्ये केंद्र आणि राज्याचा हिस्सा राहणार आहे. दरम्यान काळजीवाहू भत्त्यामध्ये वरिष्ठ व कनिष्ठ गटात तिप्पट वाढ केली आहे. वरिष्ठ गटात ५०० रुपयांवरून वाढ करत १५०० तर कनिष्ठ गटात ४०० रुपयांवरून १२०० रुपये वाढ केली आहे. यात राज्यसरकारचा १०० टक्के हिस्सा असणार आहे.

एनसीसीच्या कंपन्या व ट्रूप्सच्या वार्षिक प्रशिक्षणाच्या खर्चामध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. कंपनीचा वार्षिक खर्च २००० वरून ६००० तर ट्रूप्सचा वार्षिक खर्च १००० वरून ३००० करण्यात आला आहे. याचबरोबर पेट्रोल भत्ता तसेच शिबिरांसाठी लागणाऱ्या भत्त्यातदेखील वाढ करण्यात आली आहे. अंशकालीन अधिकाऱ्यांच्या आऊटफिट मेंटेनन्स अलाउन्समध्ये देखील राज्यसरकारकडून १८०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

देशामध्ये २६ नोव्हेंबर १९४८ ला विशेष कायदा मंजूर करून एनसीसीची स्थापना करण्यात आली. देशातील सर्व बहुतेक शाळा व महाविद्यालयांमधून ही योजना राबवली जाते. त्याअंतर्गत सैन्याविषयी आवड निर्माण करणारे विविध कार्यक्रम घेतले जातात. त्यातून देशाप्रती आदर, निष्ठा, प्रेम असलेले साहसी युवक तयार करणे हाच संघटनेचा उद्देश आहे. राष्ट्रीय छात्र सेना अर्थात एनसीसी हा शाळा व कॉलेजमध्ये यापुढे वैकल्पिक विषय ठेवण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून एनएसएसच्या भत्त्यांमध्ये वाढ झालेली नव्हती. या मानधनवाढीमुळे एनएसएस अधिकारी तसेच छात्रसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.