एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात स्वच्छता सर्वेक्षण

0
स्वच्छता होत नसल्याची सत्ताधार्‍यांची खंत ; जनआधारच्या नगरसेवकांनी मारली बैठकीला दांडी
भुसावळ- शहरातील 24 प्रभागांमध्ये एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात स्वच्छ सर्वेक्षण केले जाणार असून त्या संदर्भात बुधवारी पालिकेत झालेल्या आढावा बैठकीला जनआधारच्या नगरसेवकांनी दांडी मारली. स्वच्छ सर्वेक्षणाचे काम घेतलेल्या अमरावती येथील सीमक आयटी एजन्सीच्या समन्वयक जावेद शेख यांनी बैठकीत प्रसंगी मार्गदर्शन केले. एक हजार 450 गुणांचे सर्वेक्षण असल्याचे ते म्हणाले. नगरविकास विभागाने 30 डिसेंबर रोजी दिलेल्या निर्णयानुसार पालिकांच्या सर्व प्रभागांमध्ये स्पर्धा निर्माण होऊन स्वच्छता वाढीस नेण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
प्रथम प्रभागास 30 लाखांचे अनुदान 
शहरातील स्वच्छ सर्वेक्षणात प्रथम आलेल्या प्रभागात 30 लाख, द्वितीय 20 तर तृतीय आलेल्या प्रभागास 15 लाखांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. शहरात या सर्वेक्षणासाठी बुधवारी पालिकेत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष लक्ष्मी मकासरे, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर व सर्व भाजपचे नगरसेवक उपस्थित होते. या बैठकीत सिमक आयटी एजन्सीचे समन्वयक शेख यांनी नगरसेवकांना स्वच्छ सर्वेक्षणासाठी करण्यात येणार्‍या उपाययोजनांची माहिती दिली.
एक हजार 450 गुणांची परीक्षा
प्रभागातील घरोघरी जावून कचरा संकलन करण्यासाठी 100, कचर्‍याच्या संकलनात ओल्या व सुक्या कचर्‍याचे वर्गीकरण पध्दतीसाठी 400, वॉर्डात ओल्या कचर्‍यावर विकेंद्रीत पध्दतीने प्रक्रिया केली जाण्यासाठी 100 तर अन्य मुद्यांसाठी एकूण 1450 गुणांची ही परिक्षा होणार आहे. पालिकेने केलेल्या नियोजनानुसार शहरातील सर्व प्रभागांमध्ये एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही परीक्षा घेतली जाईल. अमरावती येथील ाीमक एजन्सीच्या माध्यमातून सर्वेक्षण केले जाणार आहे.
नगरसेवकांनी व्यक्त केली व्यथा
पालिकेच्या माध्यमातून प्रभागांची स्वच्छता होत नाही, अशी ओरडही या बैठकीत काही नगरसेवकांनी केली. माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी यांनीही त्यांच्या वॉर्डात स्वच्छता कर्मचारी पूरेशा प्रमाणात नसल्याची शोकांतिका व्यक्त केली. यानंतर नगरसेवकांनीही आपले गार्‍हाणे मांडले. यावर नगराध्यक्ष भोळे आणि मुख्याधिकारी बाविस्कर यांनी स्वच्छतेचा प्रश्न आता पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे हाताळला जात असल्याचे सांगितले.
जनआधारच्या नगरसेवकांची दांडी
पालिकेतील स्वच्छ प्रभाग स्पर्धेसाठी झालेल्या आढावा बैठकीला जनआधारच्या नगरसेवकांनी दांडी मांरली. अर्थात त्यांचे प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन असल्याने ते उपस्थित न राहिल्याचे सूत्रांनी सांगितले.