एफटीआयआयच्या शुल्कवाढीने रसास्वाद महागला !

0

पुणे : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (एफटीआयआय) मे महिन्यात होणार्‍या अभ्यासक्रमांचे शुल्क भरमसाठ वाढवल्यामुळे चित्रपट रसग्रहणाचा अभ्यास करणार्‍या रसिकांची चांगलीच अडचण झाली आहे.

एफटीआयआय आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातर्फे 8 मे ते 3 जून या कालावधीत ’चित्रपट रसास्वाद’ अभ्यासक्रम घेण्यात येणार आहे. एफटीआयआयतर्फे दरवर्षी हा एक महिन्याचा अभ्यासक्रम घेतला जातो. सोमवारपासून सुरू झालेल्या या अभ्यासक्रमासाठी देशभरातून केवळ 86 जणांनीच प्रवेश घेतला असून, त्यातील काही जण श्रीलंकेचे आहेत. अभ्यासक्रमाचे शुल्क 15 हजार असून, राहण्यासाठी वेगळे सहा हजार, तर वातानुकूलित सेवेसाठी नऊ हजार असे शुल्क आकारण्यात आले आहे. या अभ्यासक्रमासाठी वसतिगृह सुविधा बंद करण्याचा निर्णय एफटीआयआयने घेतला होता. परंतु, संस्थेला हा निर्णय रद्द करावा लागला आहे. हे सर्व शुल्क भरले तरीही या शुल्कात जेवायची सोय नसल्यामुळे तो अतिरिक्त खर्च संबंधितांनाच करावाच लागणार आहे.

एफटीआयआयने इतरही अभ्यासक्रमांचे शुल्क भरमसाठ वाढवले असून, दिल्लीत 11 ते 14 मे दरम्यान घेण्यात येणार्‍या रसास्वाद शिबिरासाठी अडीच हजार रुपये, मुंबईत सोमय्या कॉलेजबरोबर 3 ते 30 मे दरम्यान घेण्यात येणार्‍या शिबिरासाठी 16 हजार, 13 ते 27 मे दरम्यान होणार्‍या मुलांच्या अभिनय कार्यशाळेसाठी 15 हजार, तसेच 3 जून ते 24 नोव्हेंबर दरम्यान होणार्‍या लेखन अभ्यासक्रमासाठी 90 हजार रूपये शुल्क आकारण्यात येणार असल्यामुळे चित्रपटप्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण आहे.