‘एफटीआयआय’मधील विशेष प्रशिक्षणासाठी नेपाळी कलाकार पुण्यात

0

पुणे । पुणे येथील फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) दिनांक 12 फेब्रुवारीपासून 20 दिवसांचे प्रशिक्षण शिबिर सुरू झाले असून या शिबिरात सहभागी होण्यासाठी नेपाळमधील 20 कलाकार भारतात आले आहेत. नेपाळमधील विविध भागातील कलाकारांची अभिनय कौशल्य आणि गुणवत्ता या निकषांवर या शिबिरासाठी निवड करण्यात आली आहे. शिबिरासाठी पुण्यात आलेली नेपाळी अभिनेत्री सबिना गोपाली म्हणाली, या प्रशिक्षण शिबिरासाठी मी अतिशय उत्सुक असून यामुळे माझे अभिनय कौशल्य अधिक विकसीत होईल. यातून खूपकाही शिकण्यास मिळणार आहे. माझ्या अभिनयातील वाटचालीला त्याचा भविष्यात खूप फायदा होईल.

बॉलिवूडमधील कलाकारांशी संवाद
अभिनेत्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या विशेष प्रशिक्षण शिबिराला 12 फेब्रुवारीपासून सुरूवात झाली असून ते 3 मार्चरोजी संपणार आहे. प्रशिक्षणादरम्यान सहभागी कलाकारांना रासा पद्धतीने अभिनयाच्या कसदार प्रशिक्षणात विविध कलाप्रकार शिकण्यास मिळणार आहेत, असे भारतीय दुतावासातून सांगण्यात आले. प्रशिक्षणात सहभागी झालेल्या कलाकारांना बॉलिवूडमधील मोठ्या कलाकारांबरोबर संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.

खूप काही शिकता येईल
नेपाळी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता समयम पुरी याने म्हटले की, एफटीआयआय ही अभिनयक्षेत्रातील नावाजलेली संस्था आहे. येथे आयोजित करण्यात आलेले प्रशिक्षण आणि एफटीआयआयमधील प्राध्यापकांकडून आम्हाल खूपकाही शिकण्यास मिळणार असून त्याचा उपयोग अभिनय किंवा अन्य बाबतीतही होणार आहे.