पुणे : विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेतर्फे एमआयटी एडीटी विद्यापीठ, विश्वशांती गुरुकुल, राजबाग, लोणी काळभोर येथील विश्वराज बंधार्याच्या परिसरात आयोजिलेल्या दोन दिवसीय ‘एमआयटी सांस्कृतिक संध्या’ संगीत महोत्सवाचा समारोप पं. उपेंद्र भट यांच्या सुमधुर गायनाने झाला.
यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, सौ. उषा विश्वनाथ कराड, सौ. उर्मिला विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, विश्वशांती संगीत कला अकादमीचे महासचिव आदिनाथ मंगेशकर, प्रा. स्वाती कराड-चाटे, डॉ. सुचित्रा कराड-नागरे, एमआयटी विश्वशांती संगीत कला अकादमीच्या कार्यकारी संचालिका प्रा. ज्योती कराड-ढाकणे, प्रा. सुनीता मंगेश कराड , नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील राय, माईर्स एमआयटीचे कुलसचिव सु.वा.उर्फ नाना कुलकर्णी व प्राचार्य गणाचार्य हे उपस्थित होते.
दि. ३१ डिसेंबरला झालेल्या या सांस्कृतिक संध्येच्या समारोपप्रसंगी मध्यरात्री १२.०० वाजता त्याग व समर्पणाचे प्रतीक असलेल्या यज्ञकुंडामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर, विकार, विकृती व विकल्पासारख्या दुर्गुणांची आहुती देण्यात आली. पुढील २०१९ हे वर्ष अत्यंत सुखाने, समाधानाने व शांततेने पार पडावे, यासाठी प्रार्थना करण्यात आली.
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ नववर्षाच्या पूर्व संध्येला आपल्यातील अवगुणांची आहूती देऊन उद्यापासून शांतीमय जीवन प्रत्येकाने जगावे. भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात श्रेष्ठ संस्कृती आहे. या संस्कृतीचे अनुकरण करून आपल्या आयुष्याची वाटचाल करावी. आजच्या तरूण पिढीमध्ये स्वधर्म, स्वाभिमान आणि स्वत्व जागवून खर्या अर्थाने भारतीय अस्मिता जागविण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न आम्ही करीत आहोत.”
हे देखील वाचा
“ संत ज्ञानेश्वर व तुकाराम महाराज यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या घुमटामुळे संपूर्ण जगात शांती, सहिष्णूता आणि मानवतेचा संदेश पोहोचेल. त्यामुळेच भविष्यात भारतमाता ज्ञानाचे दालन व विश्व गुरू म्हणून उदयास येईल. तसेच, भारत हा जगासमोर ज्ञान-विज्ञान असे स्वरूप मांडेल.”
यावेळी लक्ष्मण घुगे लिखित सुवर्ण पिंपळ हा ग्रंथांचे लोकार्पण डॉ.विश्वनाथ दा. कराड, गायिका गोदावरी मुंडे, प्रा. ज्योती कराड-ढाकणे व आदिनाथ मंगेशकर यांच्या हस्ते करण्यात आले.सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायिका सौ. पौरवी साठे व प्रसिद्ध गायिका श्रीमती गोदावरीताई मुंडे यांनी आपल्या सुरेल रचनांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्याच प्रमाणे अझरूद्दीन शेख यांनी बासरीवादन केले. सुरूवातीला कृष्ण वंदना व कथ्थक नृत्याच्या माध्यमातून प्रा. अबोली थत्ते यांनी कालिया दमन, कृष्ण भजन व अन्य नृत्ये सादर केली. तसेच, आर्यव्रत राहुल कराड यांनी तबला वादन व विरेंद्रप्रताप मंगेश कराड यांनी गिटार वादन करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
या संगीत महोत्सवात विश्वशांती संगीत कला अकादमीच्या विद्यार्थ्यांनी आपली गायन-वादनाची कला सादर केली. या प्रासंगी डॉ. एस.एन. पठाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले.आदिनाथ मंगेशकर यांनी स्वागतपर भाषण केले. प्रा. पायल शर्मा यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. ज्योती कराड ढाकणे यांनी आभार प्रदर्शन केले.