भुसावळ। शहरातील एमआयडीसीमध्ये विस्तारीत भागातील रस्त्यांची कामे सात महिन्यांपूर्वीच पूर्ण झाली. विस्तारीत एमआयडीसीतील प्लॉटचे वाटप झाले असले तरी सध्या या भागात एकही उद्योग सुरु झालेला नाही. अर्थात वापरापुर्वीच अवघ्या सहा महिन्यातच या भागातील रस्त्यांची मात्र वाट लागली आहे. एमआयडीसीच्या रस्ते विकासासाठी वापर झालेल्या सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी यामुळे पाण्यात गेला आहे.
डांबरीकरणानंतर सहा महिन्यातच उखडला रस्ता
शहरातील एमआयडीसीमध्ये सात महिन्यांपूर्वीत तयार झालेल्या रस्त्याची सध्या बिकट अवस्था आहे. एमआयडीसीच्या विस्तारीत भागात उद्योगधंद्यांना चालना मिळावी या हेतूने शासनाने दोन कोटी रुपयांचा निधी दिला. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर एमआयडीसीचा विकास होईल, अशी आशा होती. मात्र दुर्देवाने उद्योजकांकडून भूखंडांवर उद्योगांची मुहूर्तमेढ होण्यापूर्वीच रस्त्यांची स्थिती पुन्हा बिकट झाली आहे. अवघ्या सात महिन्यातच डांबरीकरण आणि मजबुतीकरण झालेल्या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी एमआयडीसीचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचेही दूर्लक्ष होत आहे. एमआयडीसीमध्ये गेल्या काळात पथदिवे, पाण्याची सुविधा आदी कामे पूर्ण झाली. उद्योजकांना चालना मिळेल, असे वातावरण निर्माण झाले. मात्र सध्या रस्त्यांची स्थिती अत्यंत विदारक आहे. गेल्या दहा ते बारा वर्षांपूर्वी एमआयडीसीच्या जुन्या फेजमधील रस्तेही अत्यंत विदारक झाले आहेत. दुसरीकडे नवीन भागातील रस्तेही अल्पावधीतच खड्डेमय झाल्याने एमआयडीसीचा विकास होणार कसा? असा प्रश्न निर्माण होत आहे. एमआयडीसीच्या बहुतांश भागांमध्ये सध्या भूखंडांच्या समतलीकरणाच्या नावाखाली मुरुमाचा व्यापार सुरू आहे. यामुळे दररोज खोदकाम आणि अवजड ट्रक, डंपरद्वारे मुरुमाची वाहतूक केली जाते. या रस्त्यावरून अवजड वाहने रात्रंदिवस चालवली जात असल्यानेही रस्त्यावर खड्डे पडल्याचे चित्र समोर आले आहे.