एमआयडीसी परिसरात मजूराला मारहाण करून लुटले

0

जळगाव। एमआयडीसी परिसरातील खदानीजवळ शुक्रवारी रात्री 8.30 वाजता मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी एकाला बेदम मारहाण करून त्यांच्याजवळील मोबाईल व 2 हजार रुपये बळजबरीने हिसकावून नेल्याची शनिवारी उघडकीस आली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी तपासाला वेग देत एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला 11 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मोबाईलसह दोन हजारांची रोकड हिसकावली
एमआयडीसी परिसरातील साईनगरात वास्तव्यास असलेले प्रेमचंद भगवान पवार (वय-36) यांना शुक्रवारी रात्री 8.30 वाजता एमएच.19.बीएक्स 3344 या दुचाकीवरून आलेल्या विवेक ईश्‍वर वंजारी, तुषार अशोक पाटील, परमानंद उर्फ कृष्णा संजय पाटील (सर्व रा. चिंचोली) या तिघांनी अडवून त्यांना मारहाण केली आणि त्यांच्याजवळ असलेल्या दोन हजार रूपये किंमतीचा मोबाईल व खिशातील दोन हजारांची रोकड हिसकावून नेली. यानंतर प्रेमचंद पवार यांच्या फिर्यादीवरून शनिवारी सकाळी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

चिंचोलीत आवळल्या आरोपींच्या मुसक्या
दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी लागलीच तपासात वेग दिल्याने एमएच.19.बीएक्स 3344 ही दुचाकी घेवून एक इसम चिंचोली गावातील भोईटे शाळेजवळ उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी चिंचोली गाव गाठत दुचाकीवरील तरूणाला पकडले आणि दुचाकी ताब्यात घेतती. त्याची विचारपूस केल्यानंतर त्याने विवेक वंजारी असे नाव सांगितले व अन्य साथीदारांचेही नाव सांगितले. यातच शनिवारी त्यास न्यायाधीश एन. के. पाटील यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. तर न्यायाधीश पाटील यांनी संशयित चोरटा विवेक वंजारी याला 11 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. अ‍ॅड. अविनाश पाटील यांनी कामकाज पाहिले.