एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या दोनच दिवसांत चोरलेली महागडी सायकल हुडकून काढली

0

जळगाव : शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील टीएम नगरातून महागडी सायकल व हवा मारण्याचा पंप चोरीची घटना घडली होती. गुन्हा दाखल होताच अवघ्या दोन दिवसात एमआयडीसी पोलिसांनी ही सायकल हुडकून काढली असून सायकलीसह तिघांना ताब्यात घेतले आहे.

घराच्या कम्पाउंडमधून लांबविली होती सायकल
टीएम नगरात जितेंद्र श्रीचंद तलरेजा हे आपल्या कुटुंबासह राहतात. नेहमीप्रमाणे त्यांनी आपली पंधरा हजार रुपये किमतीची सायकल घराच्या कंम्पाउंडमध्ये उभी केली होती. सकाळी ७ वाजता उठल्यावर कम्पाऊंडमध्ये उभी केलेली सायकल तसेच हवा मारण्याचा पंप त्यांना दिसला नाही .याबाबत त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती . या तक्रारीवरून १५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता .

पथकाने तिघांच्या आवळल्या मुसक्या
मेहरूणमधील तरुणाने त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांसोबत ही सायकल चोरल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनायक लोकरे यांना मिळाली . त्यानुसार त्यांनी गुन्हे शोध पथकातील सहायक फौजदार, आनंदसिंग पाटील, हर्षवर्धन सपकाळे , सचिन चौधरी , सचिन पाटील यांना कारवाईच्या सूचना केल्या. पथकाने मेहरूणमधील अविनाश रामेश्वर राठोड (वय १९) यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे . त्यांच्याकडून चोरीची सायकल हस्तगत करण्यात आली आहे.