एमआयडीसी बोगस उद्योग दाखवून लाटले कोट्यवधी रुपये

0

अ‍ॅड. विजय भास्कराराव पाटील यांचा आरोप

जळगाव: जामनेर येथील प्रस्तावित एमआयडीसीसाठी काही व्यापार्‍यांनी राजकीय सत्तेचा वापर करून शेतकर्‍यांकडून किरकोळ भावाने जमिनी खरेदी केल्या असून त्या जमिनीवर बोगस वृक्षलागवड व इतर कृषी उद्योग दाखवून शासनाकडून कोट्यवधी रुपये घेतले आहे तसेच यामध्ये शासनाची स्टॅम्प ड्युटी देखील बुडवली आहे. सदर घोळ हजारो कोटीच्यावर असल्याच्या आरोप अ‍ॅड. विजय भास्कराव पाटील यांनी केला आहे. याबाबत त्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे ऑनलाईन तक्रार केली आहे.

बीएचआर घोटाळ्यातील संशयितांचा सहभाग?
अ‍ॅड. विजय पाटील यांनी दिलेल्या निवेदनानुसार असे की, नुकतेच जळगाव येथे भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट सहकारी संस्थेवर पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी धाडी टाकल्या असून त्यातून सुमारे हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. बीएचआर घोटाळाप्रकरणातील संशयित आरोपींचे प्रस्तावित जामनेर येथील एमआयडीसीच्या जागेशी संबंध असल्याचेही पाटील यांनी म्हटले आहे. तसेच शासनाने या अधिग्रहित केलेल्या जमिनी ज्या व्यक्तींनी शेतकर्‍यांकडून घेतलेल्या आहेत त्या व्यक्तींची नावे भाईचंद हिराचंद रायसोनी या पतसंस्थेच्या गुन्ह्यात आरोपी म्हणून निष्पन्न झालेली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

मोबदला अदा करु नये
या अधिग्रहित केलेल्या जमिनीपोटी एममायडिसी लवकरच मोठी रक्कम अदा करणार येणार आहे. तरी औद्योगिक विकास महामंडळाकडून संबंधितांना कुठलाही मोबदला देण्यात येवू नये. कारण या गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखा पुणे करीत आहे. सदरची रक्कम कोणत्याही परिस्थितीत वितरीत करण्यात येऊ नये अन्यथा होणार्‍या परिणामास एमआयडीसी व त्याचे अधिकारी जबाबदार राहतील असेही निवेदनात म्हटले आहे.