शिवाजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत. दक्षिण भारतातला सुपरस्टार, लार्जर दॅन लाइफ अशी प्रतिमा असलेला. तामीळनाडूतील जनतेला दोन गोष्टींबद्दल खूप आत्मीयता आहे, सिनेमा आणि राजकारण. या दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा सोन्याहून पिवळे झालेच म्हणून समजा. तामीळनाडूमध्ये दिवंगत नेत्या जयललिता यांची एखाद्या देवीप्रमाणे पूजा केली जायची. तसाच सन्मान तामीळनाडूतील जनतेने रजनीकांत यांना दिला आहे. ते त्याच्यासाठी काहीही करायला तयार होतील. स्वत: रजनीकांत यांनाही त्याची जाणीव होती. त्यामुळेच रजनीकांत यांनी 26 ते 31 डिसेंबरदरम्यान चेन्नईत एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमात रजनीकांत यांनी आपल्या हजारो चाहत्यांशी थेट संपर्क साधला. या कार्यक्रमाचा शेवट होत असताना रजनीकांत यांनी सरळ राजकारणात उडी मारत असल्याची घोषणा केली. रजनीकांत यांनी आपल्या राजकीय पक्षाची घोषणा करून राज्यातील एकूण 234 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले.
मुळात तामीळनाडूच्या राजकारणात अभिनेते, अभिनेत्री असणे नवीन नाही. सुमारे 45 वर्षांपूर्वी मारुदुर गोपालन रामचंद्रन उर्फ एमजीआर यांनी राजकीय पक्षाची घोषणा केली होती. त्यावेळी एमजीआर यांचा सिनेमा संपला की टॉकीजमधील पडद्याच्या आजूबाजूला नाण्यांचा ढीग लागलेला असायचा. त्याचदरम्यान तामीळनाडूच्या राजकारणात सिनेसृष्टीतील आणखी एका बड्या चेहर्याचा प्रवेश झाला होता. हा चेहरा होता डीएमकेचे सर्वेसर्वा असलेल्या करुणानिधी यांचा. 1969 साली अण्णादुराई यांचे निधन झाल्यावर करणानिधी यांनी पक्षाची सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली. एमजीआर यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे करुणानिधींंंना अडचण व्हायला लागली. तशीच परिस्थिती एमजीआर यांची होती. त्यामुळे एमजीआर यांनी 1972 मध्ये डीएमकेच्या काळा आणि लाल पट्टी असलेल्या झेंड्यामध्ये सफेद पट्टी वाढवून अण्णा द्रमुक मुनेत्र कडघम नावाचा नवीन पक्ष काढला. 1977 मध्ये एमजीआर यांच्या नेतृत्वाखाली अण्णाद्रमुकने पहिल्यांदा निवडणूक लढवताना 234 जागांच्या विधानसभेत 144 जागा जिंकल्या. लोकांचा राजा म्हणून ओळखल्या जाणारे एमजीआर 1977 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. त्यानंतर तामीळनाडूच्या राजकारणावर असलेला तामीळ सिनेमाचा प्रभाव कधीच ओसरला नाही.
करुणानिधी आणि एमजीआर यांच्यानंतर जयललिता, जानकी, वाय. एस. राजशेखर रेड्डी सारख्या राजकारण्याची जनेतेचे मसिहा अशीच छबी आहे. रजनीकांतने तामिळी जनतेत एक वेगळे स्थान मिळवले आहे. त्यामुळे राजकारणात उतरुन रजनीकांत आता एमजीआर यांच्या पावलावर पाऊल ठेवून वाटचाल करत आहे. राजकारणातला प्रवेश हा आजचा नाही तर सिनेमे आणि वेगवेगळ्या प्रसंगी केलेली वक्तव्येही राजकारणात सक्रिय असल्याची चिन्हे होती, अशी कबुली रजनीकांतने दिली आहे. 1990च्या दशकात रजनीकांतचे दोन सिनेमे प्रदर्शित झाले होते. अण्णामलाई आणि बाशा या त्या दोन चित्रपटांनी रजनीकांतला दक्षिण भारतातील सिनेसृष्टीचा सुपरस्टार बनवून टाकले. बाशाला मिळालेल्या यशामुळे 1995मध्ये रजनीकांत राजकारणात येणार असल्याच्या चर्चांचे पेव फुटले होते. जयललिता सरकार व रजनीकांत यांची खूपवेळा तूतू-मैमै झाली. त्यावेळी 1996 च्या विधानसभा निवडणुकीत रजनीकांत यांनी तामीळ मनिला काँग्रेसच्या जी. के. मुपनार यांना पाठिंबा दिला. एका मुलाखतीत रजनीकांत यांनी जयललिता यांच्यावर टीका करताना, जर जयललिता पुन्हा जिंकल्या, तर तामीळनाडूला देवही वाचवू शकणार नाही, असे म्हटले होते. त्यामुळे जयललितांच्या पक्षाला त्यावेळी केवळ चारच जागा जिंकता आल्या व स्वत: जयललिताही पराभूत झाल्या. ही थलैव्वाची राजकारणातील खरी सुरुवात होती.
तामीळनाडूतील सध्याच्या राजकीय स्थितीचा अंदाज घेतला तर रजनीकांत भाजपशी हातमिळवणी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजेच राज्यात रजनीकांत जिंकले, तर केंद्रात ते भाजपला साथ देतील. पण टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात ए राजा आणि कनिमोझी यांना क्लीन चिट मिळाल्यामुळे करणानिधी काँग्रेसची साथ सोडून भाजपचा हात धरतील, असा अंदाज आहे. जयललिता यांच्या मृत्यूनंतर एआयएडीएमकेत सगळच बिघडलेले आहे. पुढील विधानसभेची निवडणूक डीएमकेसाठी फलदायी ठरू शकते. पण त्याचवेळी रजनीकांत यांच्या पक्षाने निवडणुकीत बाजी मारली, तर राज्यातील राजकीय चित्र आणखी वेगळे असेल.
– विशाल मोरेकर
प्रतिनिधी जनशक्ति, मुंबई