पुणे । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणार्या स्पर्धा परीक्षांच्या समांतर आरक्षणाचा वाद न्यायालयात असल्यामुळे या स्पर्धा परीक्षांचे निकाल रखडले असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे. उच्च न्यायालयात हा विषय प्रलंबित असताना सदर प्रकरणाबाबत राज्य सरकारकडून कोणताही स्पष्ट खुलासा केला जात नसल्याने संपूर्ण प्रक्रिया होऊनही लोकसेवा आयोगाकडून निकाल जाहीर केले जात नसल्याचे स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. या परीक्षेच्या नंतर घेण्यात आलेल्या उत्पादन शुल्क अधिकारी परीक्षेचा निकाल लागला असून, या पदांसाठीही समांतर आरक्षण असतानाही या जागांचा निकाल लावण्यात आला आहे. मग हा नियम केवळ सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पदाच्या परीक्षेलाच का लागू असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.
आयोग म्हणते, स्पष्टीकरण नाही!
सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक, कर सहाय्यक, पोलिस उपनिरीक्षक आदी पदांच्या निकालांचा यामध्ये समावेश आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकपदाच्या 833 जाग भरण्यासाठी 6 ऑगस्ट 2017 रोजी मुख्य परीक्षा घेण्यात आली. या पदाच्या पूर्व परीक्षेत 8 हजार उमेदवार पात्र झाले होते. या परीक्षेची अंतिम उत्तरतालिका 18 नोव्हेंबर 2017 रोजी जाहीर करण्यात आली. सर्वसाधारणपणे अंतिम उत्तरतालिका जाहीर झाल्यानंतर आयोगाकडून आठवडाभरात अंतिम निकाल जाहीर केला जातो. मात्र हा निकाल अद्यापही जाहीर झाला नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. याबाबत आयोगाकडे विचारणा केली असता सरकारकडून जोपर्यंत याबाबत स्पष्टीकरण देण्यात येत नाही तोपर्यंत काही करता येणार नसल्याचे आयोगाने सांगितले असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.