मुंबई: एमपीएससीद्वारे तसेच विविध यंत्रणेद्वारे घेण्यात आलेल्या परीक्षेच्या उत्तर पत्रिकेची एक प्रप्त यंत्रणा त्यांच्याकडे जमा करतात आणि दुसरी कार्बन प्रत परीक्षार्थी उमेदवाराला सोबत घेऊन जाण्याची परवानगी असते. त्यामुळे परीक्षार्थी उमेदवारांना उत्तर तालिका प्रसिद्ध झाल्यानंतर गुणांचा अंदाज बांधण्यास मदत होते. दरम्यान उमेदवारांना त्यांनी संबधित परीक्षेमध्ये प्रत्यक्ष प्राप्त केलेले अचूक गुण ज्ञात व्हावेत व उमेदवारास परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या गुणांच्या संदर्भात कोणतीही शंका राहू नये, यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक मोठा निर्णय घेतला आहे. मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन इमेज, निकालाकरीता गृहित धरलेले एकूण गुण व उमेदवार पात्र असलेल्या प्रवर्गाकरीताच्या गुणांची किमान सीमांकन रेषा संबधित परीक्षेच्या निकालानंतर त्यांच्या वैयक्तिक प्रोफाईलद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या संदर्भात आयोगाने परिपत्रक काढून माहिती दिली आहे. त्यात निर्णय जाहीर केला आहे.
उमेदवारांना त्यांनी संबधित परीक्षेमध्ये प्रत्यक्ष प्राप्त केलेले अचूक गुण ज्ञात व्हावेत व उमेदवारास परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या गुणांच्या संदर्भात कोणतीही शंका राहू नये, यासाठी खालील तपशील संबधित परीक्षेच्या निकालानंतर त्यांच्या वैयक्तिक प्रोफाईलद्वारे उपलब्ध करून देण्याचा आयोगाकडून निर्णय घेण्यात आला आहे. आयोगाचा उपरोक्त निर्णय १ ऑक्टोबर २०२० नंतर आयोजित होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा तसेच चाळणी परीक्षांसाठी लागू राहणार असल्याचे कळवण्यात आले आहे.