अतिरिक्त पाण्याची सोय कशी करणार : एमसीएला पत्राद्वारे विचारणा
आयपीएल सामन्यांवर पाणीटंचाईचे सावट कायम
पिंपरी-चिंचवड : गहुंजे येथील आयपीएल सामन्यांवर पाणीटंचाईचे सावट कायम असून, पुणे महानगर विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) आयपीएल सामन्यांना अतिरिक्त पाणी देण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. तसेच, अतिरिक्त पाण्याची सोय कशी करणार, अशी विचारणादेखील प्राधिकरणाने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए)ला पत्राद्वारे केली आहे. प्राधिकरणाचे आयुक्त किरण गित्ते यांनीच ही माहिती दिली. मैदानासाठी लागणारे पाणी कसे मिळविणार याबाबत उच्च न्यायालयाने एमसीएला विचारणा केली असतानाच, पीएमआरडीएच्या पत्रानेदेखील एमसीएच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे पुण्यात आयपीएलचे सामने खेळविले जाणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पाण्याची नासाडी करण्यास स्वयंसेवी संस्थांचा विरोध
पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी सांगितले, की एमसीएला या संदर्भात सविस्तर पत्र देण्यात आले आहे. त्यात ते अतिरिक्त पाण्याची सोय कशी करणार असे त्यांना विचारण्यात आलेले आहे. आयपीएल सामन्यांसाठी मैदान तयार करणे व नंतर त्याची निगा राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागते. या पाण्याची त्यांनी कशी सोय केली आहे, याबाबत त्यांच्याकडून माहिती मागविण्यात आली आहे. गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हे सामने खेळविण्याचे एमसीएने निश्चित केलेले आहे. तथापि, पाण्याचा अपव्यय होण्याची शक्यता गृहीत धरून अनेकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत, सामन्यांना विरोध दर्शविला आहे. या सामन्यासाठी पवना धरणातून पाणी देण्यास विरोधही करण्यात आला आहे. पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी नसताना आयपीएल सामन्यांवर पाण्याची नासाडी का, असा याचिकाकर्त्यांचा सवाल आहे. आयपीएलसाठी पीएमआरडीए अतिरिक्त पाणी अजिबात देणार नाही, अशी भूमिकाही गित्ते यांनी एमसीएला स्पष्ट शब्दांत कळविलेली आहे.
बुधवारी उच्च न्यायालयात सुनावणी
तामिळनाडूतील कावेरी पाणीप्रश्नावरून चेन्नई येथील आयपीएल सामन्यांना पाणी देण्यास नकार मिळाल्यानंतर चेन्नईत खेळविले जाणारे सहा सामने महाराष्ट्रात खेळविण्याचा निर्णय क्रिकेट असोसिएशनने घेतलेला आहे. दुसरीकडे, राज्यातदेखील 2016 पासून दुष्काळसदृश परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत या सामन्यांवर पाण्याची नासाडी करणे परवडणारे नाही. मैदाना व पीच व्यवस्थित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागते. तेव्हा पाण्याची नासाडी रोखण्यासाठी राज्यात आयपीएलला परवानगी देऊ नये, अशी विनंती करणारी याचिका काही स्वयंसेवी संस्थांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या आहेत. या याचिकांवर न्यायालय सुनावणी घेत आहे. पाण्याची सोय कशी करणार याबाबत एमसीए 18 एप्रिलरोजी आपले म्हणणे सादर करणार आहे. एमसीएचे अध्यक्ष अभय आपटे यांनी सांगितले, की पाण्यासाठी आमच्याकडे वेगवेगळे स्त्रोत आहेत. तथापि, अधिकृतरित्या त्याबाबत आताच माहिती देता येणार नाही. आम्ही आमचे म्हणणे उच्च न्यायालयापुढे सादर करू, असेही त्यांनी सांगितले.
सामने होणार, एमसीएकडे पाण्याची पुरेशी सोय
एमसीएला क्रिकेट सामन्यांदरम्यान पवना धरणातून दररोज 2.40 लाख लीटर पाणी उचलण्याची परवानगी आहे. तथापि, एमसीए केवळ 50 हजार लीटर पाणीच उचलत आहे, अशी माहिती आयपीएलचे सचिव रियाज बागवान यांनी दिली. तसेच, एमसीएकडे स्वतःचे रेन वॉटर हार्वेस्टिंग प्लॅण्ट आहेत. त्यांची 16 लाख लीटर साठ्याची क्षमता आहे. तसेच, पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणीही टँकरद्वारे मैदानाच्या निगरानीसाठी वापरता येणे शक्य आहे. त्यामुळे गहुंजे येथील आयपीएल सामन्यांना पाण्याची कमतरता भासेल, अशी परिस्थिती नाही. गहुंजे स्टेडियम हे पीएमआरडीच्या अख्त्यारित येत असल्याने त्याला पाणी पुरवठा करण्यासाठी पुणे किंवा पिंपरी-चिंचवड महापालिका कटिबद्ध नाही. त्यामुळे एमसीए पीएमआरडीएच्या पत्राला व उच्च न्यायालयात काय भूमिका मांडते, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागलेले आहे.