जळगाव। उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रशाळा व संलग्नित महाविद्यालयातील एम.एस्सी. प्रथम वर्ष या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विविध विषयासाठी केंद्रीय पध्दतीने दिल्या जाणार्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 30 जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यात तांत्रिक अडचण आल्यामुळे अर्जास उशीर झाल्याने विद्यार्थी हित लक्षात घेवून कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी 30 जून पर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. 10 जून पासून विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन माहिती व नोंदणी अर्ज विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
17 ठिकाणी अर्ज स्वीकृती केंद्र
विद्यार्थ्यांनी नोंदणी शुल्क चलनाद्वारे भरणे आवश्यक आहे. 1 जुलै पर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन भरलेले अर्ज स्वीकृती केंद्रावर आवश्यक त्या कागदपत्रांसह जमा करणे आवश्यक आहे. 3 जुलै रोजी प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर होईल. 6 जुलै पर्यंत त्यावर आक्षेप नोंदविता येणार आहे. 7 जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल. त्यानंतर प्रवेशासाठी पहिल्या, दुसर्या व तिसर्या फेरीचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर वेळोवेळी जाहीर करण्यात येईल. प्रवेशित विद्यार्थ्यांना संदेशाद्वारे कळविण्यात येणार आहे. विद्यापीठाने या प्रवेश प्रक्रियेसाठी 17 अर्ज स्वीकृती केंद्र ठेवले असून त्याची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आहे, अशी माहिती केंद्रीय प्रवेश समितीचे अध्यक्ष प्रा.फपी.पी.माहुलीकर यांनी दिली.