नवी दिल्ली- एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाने #Me Too मोहिमेद्वारे लैंगिक छळाचे आरोप झालेले पत्रकार तसेच मोदी सरकारमधील माजी मंत्री एम.जे.अकबर आणि बलात्काराचे आरोप असलेले तेहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांचे सदस्यत्व रद्द केले आहे. पत्रकारीतेतून राजकारणाकडे वळलेल्या एम.जे.अकबर यांच्यावर अनेक महिला पत्रकारांनी लैंगिक छळाचा आरोप केला आहे. या आरोपांमुळे त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.
सध्या या प्रकरणी न्यायालयात खटला सुरु आहे. तरुण तेजपाल यांच्याविरोधातही बलात्काराचा खटला सुरु आहे. खटल्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत अकबर आणि तेजपाल दोघांचे सदस्यत्व निलंबित करण्यात यावे असे कार्यकारी समितीकडून ईजीआयला सांगण्यात आले.
गौतम अधिकारी यांच्यासंबंधी निर्णय घेण्याआधी त्यांना त्यांची बाजू मांडण्यास सांगण्यात आले आहे. एडीटर्स गिल्डने महिला पत्रकारांचे समर्थन करताना अकबर यांना पत्रकार प्रिया रमाणी यांच्या विरोधात दाखल केलेला खटला मागे घेण्याचे आव्हान केले होते.