सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या अनुकूल अहवालासाठी स्वीकारली पावणेदोन लाखांची लाच
एरंडोल- सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या अनुकूल अहवालासाठी पावणेदोन लाखांची लाच घेताना एरंडोलचे सहाय्यक निबंधक तथा जळगावचे प्रभारी उपनिबंधक मधुसुदन हरनिवास लाठी (52, रा.अमळनेर) यांना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी जळगावातील काव्य रत्नांजली चौकातील मिटींग पॉईंट हॉटेलजवळून अटक केली. दरम्यान, लाठी वर्ग एकचे अधिकारी असल्याने त्यांच्यावरच ट्रॅप झाल्याने सहकार विभागातील लाचखोर अधिकारी व कर्मचार्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
जळगावात आवळल्या आरोपीच्या मुसक्या
या प्रकरणातील तक्रारदाराची सहकारी गृहनिर्माण संस्था असून ती रद्द न होण्यासाठी शिवाय अपिलाल अनुकूल से (अहवाल) देण्याकरीता तक्रारदाराकडे पावणे दोन लाख लाचेची मागणी 6 ऑक्टोबर रोजी करण्यात आली होती. तक्रारदाराने जळगाव एसीबी कार्यालयात तक्रार नोंदवल्यानंतर लाचेची पडताळणी करण्यात आली तर 9 रोजी सायंकाळी आरोपीने लाचेची रक्कम घेवून तक्रारदारास जळगावातील काव्य रत्नांजली चौकातील मिटींग पॉईंट येथे बोलावले असता पंचांसमक्ष त्यास लाच स्वीकारताना त्यास अटक करण्यात आली. ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक निलेश लोधी व सहकार्यांनी केली.
तक्रारदारांना पुढे येण्याचे आवाहन
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे तक्रारदारांना पुढे येण्यासाठी पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या नेतृत्वात जनजागृती केली जात आहे शिवाय गेल्या आठवड्याभरात आतापर्यंत तीन लाचखोरांवर एसीबीने कारवाई केल्याने भ्रष्टाचार्यांच्या गोटात खळबळ उडाली आहे. शासकीय अधिकारी, कर्मचारी लाच मागत असल्यास तक्रारदारांनी न घाबरता तक्रार द्यावी तसेच तक्रार देण्यासाठी जळगाव कार्यालयात येण्याची गरज नाही, शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू, असे सांगत ठाकूर यांनी तक्रारदारांनी भ्रमणध्वनी क्रमांक 9607556556 वर संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.