एरंडोल नगर पालिकेतर्फे शहरात स्वच्छता मोहीमेसाठी जनजागृती

0

एरंडोल । येथील नगर पालिकेच्या वतीने शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहरात विशेष स्वच्छता मोहीम सुरु करण्यात आली असून नागरीकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. नगरपालिकेने सुरु केलेल्या स्वच्छता मोहीमेचे नागरिकांकडून स्वागत केले जात असून सदरची मोहीम कायम स्वरूपी सुरु ठेवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. नगर पालिकेचे आरोग्य विभागातील कायम व रोजंदारी कर्मचारी दररोज शहरातील तुंबलेल्या गटारी स्वच्छ करून रस्त्यावरील केरकचरा जमा करीत आहेत. तसेच प्रमुख रस्त्यांवर कर्मचारी सकाळी झाडझूड करून नागरिकाना स्वच्छतेबाबत माहिती देत आहेत.

5 घंटा गाड्यांच्या माध्यमातून शहरात कचरा होतो जमा
शासनाच्या घनकचरा व्यवस्थापन हाताळणी अंतर्गत प्रधान सचिव नगर परिषद प्रशासन संचालनालय यांच्या आदेशावरून पालिकेने चौदाव्या वित्त आयोगातून घरोघरी कचरा गोळा करण्यासाठी द्वारका स्वयंरोजगार सहकारी संस्थेच्या मार्फत पाच घंटा गाड्यांच्या माध्यमातून शहरात सर्वत्र फिरून कचरा जमा केला जात आहे. बंदिस्त असलेल्या घंटा गाड्यात जमा झालेल्या कचर्‍याची शहरापासून 10 किलोमीटरवर असलेल्या पद्मालय रस्त्यावरील गट क्रमांक 306 मधील कंपोस्ट डेपोवर डम्पिंग पद्धतीने विल्हेवाट लावली जात आहे. शहरातून जमा झालेल्या ओला, कोरडा कचरा तसेच प्लास्टिकच्या वस्तू यांच्या विलगीकरणाची मोहीम आगामी काळात सुरु करणार असल्याचे नगराध्यक्ष रमेश परदेशी व मुख्याधिकारी विशाखा मोटघरे यांनी सांगितले.

पालिकेतर्फे विविध ठिकाणी वाढलेली काटेरी झुडपे तोडण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. तसेच प्लास्टिक मुक्त शहर निर्माण करण्याच्या दृष्टीने कर्मचारी शहरातील व्यावसयिकांकडे जाऊन प्लास्टिक प्लास्टिकच्या वस्तू जप्त करून दंड आकारणी करीत आहेत. पावसाळ्यात गटारी तुंबणार नाहीत यासाठी पालिकेतर्फे विशेष नियोजन करण्यात येत आहे. दररोज सकाळी व दुपारी घंटागाडया कचरा जमा करून ध्वनिक्षेपकावरून नागरीकांना विविध शासकीय योजनांची व स्वच्छतेबाबत माहिती देऊन जनजागृती केली जात आहे.

नागरीकांकडून सहकार्याची अपेक्षा
नागरिकांनी देखील आपापला परिसर स्वच्छ ठेऊन तसेच घंटागाडीतच कचरा टाकून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे. शहराचे सुशोभिकरण करणार असल्याचे नगराध्यक्ष रमेश परदेशी यांनी माहिती दिली. एरंडोल शहराचे सुशोभिकरण करून आदर्श शहर निर्माण करण्यासाठी पालिकेतर्फे प्रयत्न करण्यात येणार आहेत. नागरिकांनी देखील पालिकेच्या उपक्रमास सहकार्य करावे. सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन शहराचा विकास करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहे.