एरंडोल। स मन्वय समितीच्या सभेत आमदार डॉ. सतिष पाटील यांनी आदेश दिल्या नंतर देखील बस स्थानक व परिसरातील समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी आगार प्रमुख शिरसाठ यांचा गुलाब पुष्प देवून सत्कार करून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले. लोकप्रतिनिधींच्या आदेशाला केराची टोपली दाखविणार्या आगार प्रमुख शिरसाठ यांच्या कार्यपद्धतीबद्दल प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. बसस्थानक परिसरातील समस्या त्वरित सोडविण्यात याव्यात, अन्यथा आगामी काळात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी यावेळी दिला.
दोन महिन्यांचा कालावधी उलटूनदेखील सर्व समस्या ‘जैसे थे‘
बसस्थानक व आगाराच्या परिसरात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ मोठा खड्डा पडला असून प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.तसेच स्थानकात सर्वत्र अस्वच्छता असून डासांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.स्थानकाला काटेरी झुडूपांनी वेढले असून या ठिकाणी डुकरे,मोकाट कुत्रे यांचा मुक्त संचार असतो. तसेच रात्रीच्या वेळी सर्वत्र अंधार असल्यामुळे अनेक गैर प्रकार याठिकाणी सुरु असतात. प्रेमी युगुलांसाठी बस स्थानक म्हणजे अत्यंत सुरक्षित ठिकाण बनले आहे. या सर्व समस्यांबाबत तालुक्याच्या समन्वय समितीच्या सभेत नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या.
समन्वय समितीच्या सभेस आगार प्रमुख गैरहजर असल्यामुळे आमदार डॉ.सतिष पाटील संतप्त झाले होते. त्यांनी आगार प्रमुखाना सभास्थळी बोलावून आक्रमक शैलीत खडेबोल सुनावले होते.बस स्थानक परिसरातील समस्या त्वरित सोडविण्याचे आदेश आमदार डॉ.सतिष पाटील यांनी दिले होते. मात्र सुमारे दोन महिन्यांचा कालावधी उलटून देखील सर्व समस्या जैसे थेच होत्या. त्यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी बस आगारात जावून समस्या न सोडविल्याने आगार प्रमुख शिरसाठ यांचा गुलाबपुष्प देवून सत्कार केला व गांधीगिरीच्या मार्गाने आंदोलन केले.
आंदोलनाचा दिला इशारा
लोक प्रतिनिधींच्या आदेशाकडे दुर्लक्ष करणारे आगार प्रमुख सर्वसामान्य प्रवाशांशी कशा पद्धतीने वागत असतील असा प्रश्न यावेळी पदाधिकार्यांनी उपस्थित केला. याबाबत त्वरित दाखल घ्यावी, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पदाधिकार्यांनी दिला आहे. यावेळी नगरसेवक डॉ.सुरेश पाटील, बबलु चौधरी, तालुकाध्यक्ष डॉ.राजेंद्र देसले, शहराध्यक्ष प्रा.मनोज पाटील, संदीप वाघ, अहमद सय्यद, जिल्हा सरचिटणीस आर.डी.पाटील, विश्वास पाटील, दशरथ चौधरी, महेंद्र पाटील, उमेश पाटील, शालिक पाटील, प्रा.आर.एस.निकुंभ, योगराज महाजन, भिकन खाटिक, दिपक अहिरे यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.