एरंडोल – येथील जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग कार्यालया समोर आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास अचानक मारोती ब्रेन्झा कारने पेट घेतल्यामुळे कर्मचारी व नागरिकांना द बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. या दुर्घटनेत कोणतीही जीवित हांनी झाली नसली तरी कार जळून खाक झाली. याबाबत माहिती अशी कि, धुळे येथील अमोल विठ्ठल लंगोटे हे आज दुपारी जळगाव येथुन एरंडोल येथील जिल्हा परीषद बांधकाम उपविभागाच्या कार्यालयात कागद पत्र घेण्यासाठी मारोती ब्रेन्झा कार क्रमांक (एमएच १८ एजे९४३२) ने आले होते. कार्यालयासमोर कार उभी करून ते कार्यालयात गेले असता कारच्या चालक बाजुकडील दरवाजा, चालक सीट व चाकांनी अचानक पेट घेतला. त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. कार्यालयीन कर्मचारी व परिसरातील नागरिकांनी पेटती कार विझवल्यामुळे पुढील अनर्थ टळला. याबाबत अमोल लंगोटे यांनी दिलेल्या तक्रारी वरून पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून सहाय्यक उपनिरीक्षक नारायण पाटील व निलेश ब्राम्हणकर तपास करीत आहे.