एरंडोल येथे पत्त्याच्या अड्ड्यावर पोलीस उपअधीक्षकांची धाड

0

एरंडोल : येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले व्यापार संकुलाजवळ बिनधास्तपणे सुरु असलेल्या पत्त्याच्या अड्ड्यावर पोलीस उपअधीक्षक संतोष गायकवाड व त्यांच्या सहकार्‍यांनी सिनेस्टाईल पद्धतीने धाड घालून पत्त्याचा जुगार खेळतांना अकरा जणांना अटक करून त्यांचेकडून 23हजार सातशे चाळीस रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले. यात एकशेवीस नवीन पत्त्यांच्या कॅट चा समावेश आहे.अटक केलेल्या अकराही जणांची जामिनावर सुटका करण्यात आली.जप्त केलेल्या रकमेत दोन हजार रुपयांच्या सहा नवीन नोटांचा समावेश आहे.

अवैध धंदे चालकांमध्ये खळबळ
शहरातील बस स्थानकामागे सदरचा पत्त्यांचा क्लब अनेक दिवसांपासुन बिनधास्तपणे सुरु होता.सदर क्लबमुळे व्यापार संकुलात खरेदी करण्यासाठी येणार्‍या ग्राहकांना विशेषतः महिलांना मोठ्याप्रमाणावर त्रास होत होता.आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास उपअधीक्षक संतोष गायकवाड स्वतः व साध्या वेशातील आपले सहकारी उपनिरीक्षक एम.एस.बैसाणे, संदीप सातपुते, सचिन पाटील, सुनील वानखेडे हे गुप्त पद्धतीने क्लबमध्ये गेले व आत मध्ये प्रवेश करून क्लबचा दरवाजा लावून घेतला. क्लबला दोन दरवाजे असल्यामुळे काही जुगारी दुसर्‍या दरवाजातून पळून जाण्यात यशस्वी झाले.उपअधीक्षक गायकवाड व त्यांच्या सहकार्‍यांनी रमेश मदन पवार,शामकांत पाटील,सुरसिंग पाटील,वनराज महाजन, प्रवीण साहेबराव पाटील, चिंतामण मराठे, फारुखखान दागेखान, साहेबराव महाजन, गणेश महाजन, रमेश माळी, दीपक देशमुख या सर्व जुगारींना ताब्यात घेऊन पोलीस वाहनातुन पोलीस स्टेशनला आणले व त्यांचे विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी जुगाराच्या अड्ड्यावर धाड टाकल्यामुळे अवैध धंदे चालकांमध्ये खळबळ उडाली असुन सर्व सामान्य नागरिकांकडून पोलीस कारवाई चे स्वागत केले जात आहे. आगामी काळात सदरचा क्लब सुरु होणार नाही याची दक्षता पोलिसांनी घ्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.