एरंडोल येथे स्वच्छता सप्ताहानिमित्त अभियानाचे आयोजन

0

एरंडोल । एरंडोल नगर पालिकेतर्फे स्वच्छता सप्ताह निमित्त शहरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.शहराबाहेर असलेल्या पद्मालय नगर,नम्रता नगर येथून अभियानास सुरुवात करण्यात आली.नगराध्यक्ष रमेश परदेशी, नगरसेविका वर्षा शिंदे, अभिजित पाटील यांचे उपस्थितीत परिसरात स्वच्छता करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष रमेश परदेशी यांनी नविन वसाहतींमध्ये सर्वप्रकारच्या सोयी व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे निधीची मागणी केली असल्याचे सांगितले. शहर स्वच्छ राखण्यासाठी पालिकेतर्फे विशेष प्रयत्न केले जात असून स्वच्छता सप्ताह अंतर्गत तीन दिवसात शहर स्वच्छ करणार असल्याचे त्यांनी सांगितले.विविध साथीच्या आजारांना आळा घालायचा असेल तर प्रत्येक नागरिकाने आपापला परिसर स्वच्छ ठेऊन पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

पद्मालय, नम्रता नगर परीसरातील गटारी स्वच्छ
नगरसेविका वर्षा शिंदे यांनी नविन वसाहतींमध्ये रस्ते, गटारी, पथदिवे, सांडपाणी आदी समस्या निर्माण झालेल्या असल्यामुळे रहिवाशांना अनेक समस्याना तोंड द्यावे लागत असल्याचे सांगितले. पालिका नविन वसाहतींकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे स्थानिक रहिवाशांच्या रोषाला प्रभागातील नगरसेवकांना तोंड द्यावे लागत असल्याचे सांगितले. यावेळी पद्मालय नगर, नम्रता नगर या परिसरातील गावात काढून सांडपाण्याच्या चार्‍या स्वच्छ करण्यात आल्या. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोकाट कुत्रे, डुकरे यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. शहरात देखील विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी आनंद दाभाडे, राजेंद्र शिंदे यांचेसह परिसरातील नागरीक व पालिकेचे स्वच्छता विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. स्वच्छता अभियान कायम स्वरूपी सुरु ठेवण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.