एरंडोल येथे 63 हजारांची अवैध देशी दारू जप्त

0

एरंडोल । विना परवाना देशी दारूची वाहतूक करताना पोलिसांनी दोन संशयितांना वाहनासह ताब्यात घेवून सुमारे 62 हजार चारशे रुपयांची देशी दारू जप्त केल्यामुळे दारूची अवैध मार्गाने विक्री करणार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. जप्त केलेली देशी दारू धुळे येथून बुलढाणा येथे नेली जात होती.याबाबत गुलाब पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. पोनि बाळासाहेब केदारे यांना गुप्त माहिती एम.एच. 28 व्ही. 3772 या तवेरा वाहनातून दारूची अवैध मार्गाने वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसाना मिळालेल्या माहितीवरून वरून सापळा रचला. रात्रीची गस्त घालणार्‍या पोलीस पथकातिल उपनिरीक्षक एम. एस. बैसाणे, यांचेसह सहाय्यक उपनिरीक्षक गुलाब पवार, राहुल बैसाणे, प्रकाश बारी यांनी म्हसावद रस्त्यावर पाळत ठेवली.

पाठलाग करून म्हसावद नाक्यावर केले जप्त
आज पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने येणार्‍या तवेरा गाडीस पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहन चालकाने वाहन न थांबविता ते अधिक वेगाने नेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तवेरा गाडीचा पाठलाग करून म्हसावद नाक्याच्या पुढे काही अंतरावर तवेरा थांबविली. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता गाडीत देशी दारुच्या बाटल्यांचे खोके आढळून आले. वाहन चालकासह वाहनात असलेल्या त्याच्या साथीदाराकडे चौकशी केली असता ते समाधानकारक माहिती देवू शकले नाही. त्यामुळे पोलिसांनी वाहन पोलीस स्टेशन मध्ये आणून जप्त केले. वाहनात देशी दारूचे सव्वीस खोके खोके आढळून आले. प्रत्येक खोक्यात अठ्ठेचाळीस देशी दारूच्या बाटल्या होत्या. पोलिसांनी सुमारे 62हजार चारशे रुपयांच्या देशी दारुच्या बाटल्यांसह दोन लाख रुपये किमतीची तवेरा गाडी असा दोन लाख 62 हजार चारशे रुपयांचा ऐवज जप्त केला. जप्त केलेली देशी दारू धुळे येथून बुलढाणा येथे नेली जात होती. याबाबत गुलाब पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सुनील सोनवणे व गजानन शर्मा (दोन्ही राहणार संभाजीनगर, बुलढाणा) या दोन जणांना ताब्यात घेतले आहे. पोनि बाळासाहेब केदारे यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि एम.एस.बैसाणे पुढील तपास करीत आहेत.