एलअँडटी कंपनीच्या तळेगाव शाखेमधील कामगार आंदोलनाच्या भूमिकेत

0
सर्वपक्षीय स्थानिक नेत्यांच्या सहकार्याने तसेच शिवक्रांती कामगार संघटनेच्या माध्यमातून देणार लढा
पत्रकार परिषद घेऊन मांडल्या व्यथा
लोणावळा : तळेगाव एम.आय.डी.सी.मध्ये असलेल्या एलअँडटी या कंपनीतील कर्मचार्‍यांनी पगारवाढीच्या तसेच कंत्राटी पद्धतीने काम करणार्‍या स्थानिक कामगारांना कामावरून कमी केल्याचा मुद्यावर कंपनीच्या विरोधात आंदोलनाची भूमिका घेतली आहे. सर्वपक्षीय स्थानिक नेत्यांच्या सहकार्याने आणि शिवक्रांती कामगार संघटनेच्या माध्यमातून हे आंदोलन उभे करण्यात येणार असल्याची माहिती काही कामगार प्रतिनिधींनी एका पत्रकार परिषदेत दिली. लोणावळ्यातील हॉटेल चंद्रलोक येथे पार पडलेल्या या पत्रकार परिषदेला शिवक्रांती कामगार संघटनेचे सरचिटणीस अ‍ॅड.विजय पाळेकर, खजिनदार रवींद्र साठे, गुलाब मराठे, राजेंद्र पवार, रोहन आहेर, कामगार प्रतिनिधी नवनाथ गायकवाड, महेंद्र शिंदे, प्रसाद कुटे, नितीन कोकाटे, महेश बिराजदार, अजिंक्य जमदाडे, शैलेश धुमाळ आदी उपस्थित होते.
कंत्राटी कामगार जवळपास 100
साधारण 10 ते 11 वर्षापूर्वी तळेगाव एम.आय.डी.सी.मध्ये उभ्या राहिलेल्या एलअँडटी या कंपनीच्या प्लँटमध्ये संरक्षण खात्यातील काही यांत्रिक भागाचे उत्पादन केलं होतं. याठिकाणी तेव्हापासून सुमारे सव्वाशेच्या आसपास डिप्लोमा पदवी धारण केलेले महिला व पुरुष कामगार कामास आहे. मात्र या कामगारांना आजही शासकीय नियमाप्रमाणे जेमतेम किमान वेतनश्रेणीच्या आसपास वेतन दिले जाते. तसेच एवढ्या वर्षात आजवर एकही इनक्रिमेंट या कामगारांना दिले गेले नसल्याचा आरोप या कामगार प्रतिनिधींनी पत्रकार परिषदेत केला. कामगारांना जाणवणार्‍या यासारख्या अडचणींवर मात करण्यासाठी कामगारांनी कामगार संघटनेची स्थापना केली. मात्र त्यानंतर कंपनीने 9 कामगारांना कामावरून निलंबित केले. तसेच ज्यांच्या जागा जमिनी या कंपनीमध्ये गेल्या अशा कंत्राटात काम करणार्‍या स्थानिक नागरिकांना ही घरी बसविण्यात आले आहे. घरी बसवण्यात आलेल्या कंत्राटी कामगारांची संख्या जवळपास 100 असल्याचा आरोप या कामगार प्रतिनिधींनी केला आहे.
नेत्यांना निवेदन दिले 
वरील अडचणींबाबत येथील कामगारांनी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, स्थानिक आमदार बाळा भेगडे यांच्यासह सर्व पक्षातील अनेक मोठ मोठ्या स्थानिक नेत्यांना भेटून आपली निवेदन दिली असल्याची माहिती पत्रकारांना देण्यात आली. मात्र हे सर्व करूनही काही फरक न पडल्याने अखेर येथील कामगारांनी शिवक्रांती कामगार संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करण्याची तयारी सुरू केली असून, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सर्वपक्षीय स्थानिक नेत्यांना आवाहन करण्यात आले आहे.