एलआयसी कॅशचोरीचा तपास ‘जैसे थे’

0

पाच दिवसांपूर्वी यमुनानगरामध्ये चौघांनी पळविली होती बॅग
पिंपरी-चिंचवड : एलआयसी ऑफीसमध्ये पैसे घेण्यासाठी आलेल्या कॅश व्हॅनच्या कर्मचार्‍यांवर भर दिवसा वार करून कर्मचार्‍याच्या हातात असलेली पैशांची बॅग घेऊन चार चोरट्यांनी पोबारा केला. हा प्रकार गुरुवारी (दि. 3) दुपारी एकच्या सुमारास निगडीतील यमुनागरमध्ये घडला. या घटनेला पाच दिवस उलटून गेले तरी अद्याप पोलिसांच्या हाती ठोस काहीच लागले नाही. केवळ सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.

जखमी कर्मचार्‍यावर उपचार सुरूच
या घटनेत महेश पाटणे (रा. हडपसर) हा कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात अजुनही उपचार सुरु आहेत. यमुनानगर येथील एलआयसी ऑफीसमध्ये पैसे घेण्यासाठी चेकमेट कंपनीची एमएच 02 एक्सए 4699 ही व्हॅन दुपारी सव्वाएकच्या सुमारास आली होती. यानंतर पावणेदोनच्या सुमारास पैशाची बॅग व्हॅनमध्ये ठेवत असताना व्हॅन मधील कर्मचार्‍यावर रस्त्याच्या बाजूला दबा धरून बसलेल्या चौघांनी वार केले. त्याला जखमी करून पैशांची बॅग हिसकावून पळवून नेली.

25 लाख 51 हजाराची लुट
पळवून नेलेल्या बॅगमध्ये यमुनानगर एल आय सी कार्यालयातील 22 लाख, आकुर्डी एल आय सी कार्यालयातील दोन लाख 41 हजार आणि एका मॉलमधील एक लाख 10 हजार रुपये अशी एकूण 25 लाख 51 हजार रुपये रक्कम होती. कॅश घेण्यासाठी आलेल्या व्हॅनमध्ये बंदूकधारी सुरक्षारक्षक नसणे, नियमित वाहन लावण्याच्या ठिकाणी वाहन न लावणे अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याची चर्चा होत आहे.

अद्याप ठोस धागेदोरे हाती नाहीत
कॅशचोरीचे संपूर्ण प्रकरण परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहे. त्यानुसार पोलीस तपास करीत आहेत. अद्याप पोलिसांच्या हाती ठोस काहीही लागले नसल्याचे निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर आवताडे यांनी सांगितले.