श्रीनगर-जम्मू- नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानच्या कुरापती नेहमीच्याच आहे. दरम्यान आज काश्मीरमधील राजौरी आणि पूँछ या भागात नियंत्रण रेषेजवळ शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय जवानांनी केलेल्या गोळीबारात पाकिस्तानच्या सैन्यातील पाच सैनिकांचा खात्मा करण्यात आला आहे. या कारवाईबाबत पाकिस्तानी सैन्याने अद्याप दुजोरा दिलेला नाही.
दरम्यान, गेल्या आठवड्यात शुक्रवारी नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात भारतीय सैन्यातील दोन जवान शहीद झाले होते. यात पुण्यातील मेजर शशिधरन विजय नायर यांचा समावेश होता. नियंत्रण रेषेजवळ गस्त घालणाऱ्या सैन्याच्या पथकाला लक्ष्य करण्यासाठीच आयईडी बॉम्ब पेरण्यात आले होते.