पुणे – राज्य मार्ग परिवहन महामंडळाची सेवा मोफत द्यायची की सशुल्क यावरून निर्माण झालेल्या गोंधळानंतर आता सोमवारपासून सुरू होणारी सेवा देखील स्थगित करण्यात आली आहे. एसटीचा गोंधळ कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी सोमवारपासून मजूर, विद्यार्थी, भाविक आणि अडकलेल्या लोकांसाठी प्रवास सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. आता अचानक ही सेवा स्थगित करण्यात आली आहे. यामुळे अनके बस सस्थानकांवर आज गोेंधळ उडाला. एसटी कर्मचारी आणि गावी जाण्यासाठी इच्छुक असलेल्या प्रवाशांमध्ये बाचाबाचीचे प्रकार घडले. राज्य सरकारकडून येत्या काही दिवसांत सेवेबाबत निर्णय अपेक्षित आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी दिली.