‘सीसीटीव्ही’ यंत्रणेसाठी निविदा मागविल्या; महिनाभरात कामाला प्रत्यक्षात प्रारंभ
पुणे : एसटी बसने आता कात टाकण्यास सुरुवात केली आहे. त्याबरोबरच प्रवाशांना स्थानकात आणि प्रवासातही सुरक्षित सेवा देण्यासाठी महामंडळाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठीच राज्यभरातील सर्व प्रमुख स्थानकांवरील सीसीटीव्ही कार्यान्वित करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. तालुका पातळीवरील स्थानकांवरही यापुढे सीसीटीव्ही कॅमेर्याची नजर असणार आहे. त्यासाठी महामंडळाच्या वतीने निविदा मागविण्यात आल्या असून येत्या महिनाभरात या कामाला प्रत्यक्षात प्रारंभ होणार आहे. महामंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे एसटीची महत्त्वाची बसस्थानके खर्या अर्थाने ‘स्मार्ट’ होण्यास मदत होणार आहे.
भुरट्या चोरट्यांचा वावर वाढला
गेल्या काही वर्षांपासून एसटीच्या बसेसचा आणि प्रशासकीय कारभारात बदल करण्याचा प्रयत्न महामंडळाच्या वतीने करण्यात येत आहे. त्यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. त्यातून महामंडळाच्या महसुलातही वाढ झाली आहे. हे वास्तव असतानाच बसस्थानकांवरील प्रवाशांच्या असुरक्षेत दिवसेंदिवस अधिकच वाढ होत चालली आहे. प्रवाशांच्या नजरा चुकवून त्यांच्या बॅग अथवा अन्य ऐवज पळविणे यामध्ये भुरट्या चोरट्यांचा हातखंडा आहे.
प्रवाशांचा दबाव वाढला
गेल्या वर्षी तर शिवाजीनगर बसस्थानकावर औरंगाबाद येथील एका महिलेचा तब्बल पंधरा लाखांचा ऐवज लंपास केला होता. धक्कादायक बाब म्हणजे या स्थानकावर असलेले सीसीटीव्ही कॅमेरेच बंद असल्याचे त्यानंतर महामंडळ आणि पोलिसांच्या लक्षात आले होते. त्यामुळे या ऐवजावर पाणी सोडण्याची वेळ संबधित महिला प्रवाशावर आली होती. विशेष म्हणजे एवढी मोठी घटना घडूनही महामंडळाने त्याची गंभीर दखल घेतली नव्हती, अखेर प्रवाशांचा दबाव वाढल्यानंतर हे सीसीटीव्ही कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
70 लाख प्रवासी; 23 कोटींचा महसूल
राज्यात महामंडळाची 250 आगार, 3 हजार 354 छोटी मोठी स्थानके आहेत. या बसेसच्या माध्यमातून दररोज किमान 70 लाख प्रवासी प्रवास करत असून त्यातून महामंडळाला दररोज किमान 22 ते 23 कोटी रुपयांचा महसूल मिळतो. मात्र, सुरक्षा यंत्रणेच्या अभावी या प्रवाशांची संख्या हळूहळू घटत चालली आहे. त्यामुळे या प्रकाराची महामंडळाने गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार हे सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यात येणार आहेत.
सुरक्षा पुरविण्यास प्राधान्य
त्याशिवाय ज्या स्थानकांवर सीसीटीव्ही नाहीत, तेथेही हे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. यासंदर्भात महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल म्हणाले, प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्यासह त्यांना सुरक्षा पुरविणे याला महामंडळाच्या वतीने प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळेच महामंडळाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे.