एसटीची हंगामी दरवाढ लागू

0

सर्व गाड्यांना 10 टक्के भाववाढ

पुणे : कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणार्‍या वारकर्‍यांच्या भावना लक्षात घेऊन एसटी महामंडळाने तिकीट दरवाढीच्या संदर्भात एक पाऊल मागे घेतले आहे. त्यानुसार महामंडळाच्या वतीने यापूर्वी तिकिटांच्या दरात करण्यात आलेली हंगामी दरवाढ आता 20 ऐवजी 16 नोव्हेंबरपर्यंतच ठेवण्यात येणार आहे.

शासनाने मंजूर केलेल्या भाडेवाढ सूत्रानुसार यावर्षी सरसकट एसटीच्या सर्व गाड्यांना 10 टक्के लागू करण्यात आली आहे. त्यामध्ये साधी, जलद, रात्रसेवा निमआराम आणि वातानुकूलित शिवशाही आसनी या सेवा प्रकारांचा समावेश आहे. यामुळे 1 ते 16 नोव्हेंबर या कालावधीत वाढीव भाडेदराची आकारणी करण्यात येणार आहे. गतवर्षी या कालावधीत सेवाप्रकारनिहाय 20, 15 आणि 10 टक्के अशी भाडेवाढ केली होती. मात्र, यावर्षी सरसकट सर्व बसेसना 10 टक्के भाडेवाढ लागू करण्यात आली आहे. पुण्यातील शिवाजीनगर, स्वारगेट आणि पुणेस्टेशन याठिकाणावरून प्रवाशांना जादा बसेसची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या व्यतिरीक्त प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता कॅन्टॉन्मेंट बोर्ड परिसरातून बसेस सोडण्यात
येणार आहेत.

महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांनी त्यासंदर्भातील परिपत्रक जारी केले आहे. दरम्यान, महामंडळाची हंगामी दरवाढ 1 नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. त्याबाबत सर्व आगारांना आणि आगार प्रमुखांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत.