एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा; इच्छितस्थळी बदलीचे रावतेंचे आदेश

0

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. एसटीतील कर्मचाऱ्यांचा इच्छेनुसार बदलीचा मार्ग आता मोकळा झाला असून परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी यांसदर्भातील आदेश एसटी महामंडळाला दिले आहेत. त्यामुळे सुमारे बदलीच्या प्रतिक्षेत असलेल्या ३,३०७ कर्मचाऱ्यांसाठी ही नवीन वर्षाची भेट ठरली आहे.

एसटीच्या वाहक-चालकांनी दहा ते पंधरा वर्षांपासून बदलीसाठी अर्ज दाखल केले आहेत. मात्र, त्यावर अद्याप एसटी महामंडळाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. यातील बहुतांश अर्ज हे कोकण विभागातून आलेले असून या भागासाठी एसटीत भरतीची जाहिरात आल्यानंतर अनेक जण अर्ज करतात. मात्र, जास्त काळ ते या ठिकाणी राहण्यास इच्छुक नसतात. कोकण विभागात रुजू झाल्यानंतर आठवड्याभरातच कर्मचाऱ्यांनी बदलीचे अर्ज दिल्याची अनेक उदाहरणे आहेत. अशा प्रकारे ३३०७ कर्मचाऱ्यांनी गेल्या दहा ते पंधरा वर्षांत बदलीचे अर्ज केले आहेत, ज्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे अर्ज केलेल्या कर्मचाऱ्यांना ७ जानेवारी २०१९ पर्यंत इच्छितस्थळी पाठवण्याचे आदेश आता देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे बदलीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.