एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार-दिवाकर रावते

0

मुंबई – राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बंदमुळे हजारो प्रवाश्यांचे हाल होत आहेत. कामगार संघटनांनी पुकारलेला बंद हा बेकायदेशीर आहे. याबाबतची कोणतीही नोटीस एसटी प्रशासनाला मिळालेली नाही. प्रशासन याबाबतचा अहवाल सादर करून संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे एसटीचे अध्यक्ष आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले. एसटी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनवाढ आणि इतर मागण्यांसाठी राज्यातल्या विविध तेरा संघटनांनी संप पुकारला आहे.

८० टक्के वाहतूक बंद

या संपाबाबत कोणतीही नोटीस दिली नसल्याचे रावते यांनी सांगितले असले तरी या संपाबाबत राज्याच्या गुप्तचर विभागाने या बाबत सूचना दिली असल्याचे समोर येत आहे. राज्यातल्या विविध भागात संपामुळे प्रवाश्यांचे हाल होत आहेत. मुंबई जवळच्या पनवेल या अतिशय गजबजलेल्या स्थानकात ८० टक्के वाहतूक बंद असल्याचे प्रवाश्यांनी सांगितले. तर याबाबत माहिती देताना पनवेल स्थानक व्यवस्थापक सुनील पवार म्हणाले की, प्रवाश्यांना या संपाचा त्रास होत आहे. बाहेरून येणाऱ्या गाड्या आज सकाळपासून स्थानकात दाखल झालेल्या नाहीत. केवळ पनवेल स्थानकातून सुटणाऱ्या ५० टक्के गाड्यांची वाहतूक सुरू आहे. या स्तिथीतही उपस्थित कामगारांना डबल ड्युटी तसेच सुटीवर असणाऱ्यांना ड्युटीवर येण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान हा संप कधीपर्यंत सुरू राहील याबाबत कोणतीही कल्पना कामगार संघटनांनी दिली नसल्याचे पवार यांनी सांगितले. पनवेल मध्ये कर्नाटक, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातून दिवसाला ३५०० ते ४ हजार फेऱ्या होतात, पण आज ही वाहतूक पूर्णतः ठप्प पडली असल्याचे पवार यांनी सांगितले.