एसटी बस चालकाची भर रस्त्यात मुजोरी

0
वाहनचालकांमुळे अनर्थ टळला
चाकण : बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीदवाक्यानुसार प्रवाशांच्या सेवेसाठी शासनाच्या माध्यमातून सुरू असलेली एसटी बससेवेत अनेकदा वाहन चालक-वाहकांबरोबरच अधिकार्‍यांच्याही मुजोरीचा अनुभव प्रवाशांसाठी रोजचाच ठरला आहे. एसटीच्या प्रवाशांप्रमाणेच अन्य खाजगी वाहन चालकांवरही एसटीचे चालक सरकारी नोकर असल्याची कवचकुंडले घालून कशी अरेरावी करतात याचा नमुना तळेगाव चौकालगत नागरिकांना पहावयास मिळाला. शनिवारी पुणे-नाशिक महामार्गावर चाकण येथे दुपारी तीनच्या सुमारास एसटी महामंडळाची नंदुरबार-पुणे ही बस ( क्र.एम एच 20 बी एल 3770 ) नाशिक बाजूकडून पुण्याकडे येत होती. या बसवरील चालकाने चाकण येथील तळेगाव चौकाच्या जवळ कुठलाही बस थांबा नसताना अचानक वाहन थांबविले. त्यानंतर संबंधित चालकाचे वाहनावरील नियंत्रण काहीसे सुटल्याने बस मागे येऊ लागली. पाठीमागील काही वाहनचालकांनी प्रसंगावधान राखत वाहने मागे घेतल्याने मोठा अनर्थ टळला.
मध्यस्थी करणार्‍या नागरिकांनाही शिवराळ भाषा 
याबाबत काहींनी चालकास चूक निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला असता चालकाने प्रवाशांनी भरलेली एसटी भर रस्त्यात उभी करून धिंगाणा घातला. कुणालाही तक्रार करा कुणीच माझे काही करणार नाही, असे म्हणत दमबाजी, धक्काबुक्की केल्याचा प्रकार पहावयास मिळाला. याबाबत मध्यस्थी करणार्‍या अन्य नागरिकांनाही शिवराळ भाषा वापरली. संबंधित एसटी बसच्या क्रमांकावरून काहींनी थेट राज्याच्या परिवहन मंत्र्यांना आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वरिष्ठांना तक्रारी केल्या आहेत. या महामार्गावर एसटी बस चालकांच्या भरधाव वेगाने होणारे अपघात हे तर नेहमीचेच झाले आहे. एसटी बस चालक व वाहकांची वाढलेली मुजोरी प्रवाशांना अधिक त्रासदायक ठरत असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत असतात. सुटया पैशांसाठी वाहकाने लावलेला तगादा ही तर नेहमीचीच गोष्ट झाली आहे.