जिल्हा न्यायालयाचा निकाल
जळगाव- सामान्य नागरिकाकडून नियम पाळले जात नाही, कायदे मोडले जात असल्याच्या घटना घडून त्यांनाही शिक्षाही होत असते. शहरात चक्क पोलीस कर्मचार्याने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर सार्वजनिक जागी मोठ मोठ्याने आरडाओरड करुन शांततेचा भंग केल्याची घटना 1 मे 2014 रोजी घडली. या खटल्यात जिल्हा न्यायालयाने पोलीस कर्मचारी संजय रामचंद्र अहिरे वय 41 रा. सिटी पोलीस लाईन, यास 1200 रुपये दंड व दंड न भरल्यास 15 दिवसांची साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे. न्या. बी.डी.गोरे यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. या निकालामुळे कायदा हा सर्वसामान्य असो, की पोलीस कर्मचारी सर्वांसाठी सारखाच असल्याचा प्रत्यय मंगळवारी आला.
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर 1 मे 2014 रोजी जिल्हा पोलीस दलात कार्यरत पोलीस कर्मचारी संजय रामचंद्र अहिरे हे मोठमोठ्याने आरडाओरड करत असल्याची घटना घडली होती. याबाबत जिल्हा पेठ पोलीस ठाण्यातील कर्मचार्यांना माहिती मिळाल्यावर घटनास्थळ गाठले. याप्रकरणी जिल्हापेठचे कर्मचारी भुषण उखा जैतकर यांच्या फिर्यादीवरुन आरडाओरड करणार्या संजय अहिरे यांच्याविरोधात शांततेचा भंग केल्याप्रकरणी मुंबई पोलीस अॅक्ट कलम 110, 112 अन्वये नोंद करण्यात आली होती.
2 साक्षीदार तपासले
तपासपूर्ण केल्यावर याप्रकरणी जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. न्या. बी.डी.गोरे यांच्या न्यायालयात खटल्यावर कामकाज पूर्ण झाले. या सरकारपक्षातर्फे अॅड. गिरीश बारगजे यांनी 2 साक्षीदार तपासले. त्यात न्या. गोरे मंगळवारी संजय अहिरे कलम 110 मध्ये दोषी धरुन 1200 रुपये दंड व दंड न भरल्यास 15 दिवसांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली.