‘एसपीव्ही’ म्हणजे स्वायत्तेवर घाला

0

पुणे । शहरतील बहुचर्चित मुळा-मुठा नदी सुधारणा प्रकल्पासाठी स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) कंपनीची स्थापना करण्यास स्थायी समिताने मंजुरी दिली आहे. पण या कामासाठी खरोखर एसपीव्ही कंपनीची गरज आहे का? पीएमपीएल, स्मार्ट सिटी आणि आता नदी सुधारणा या कामासाठी एसपीव्ही कंपनी स्थापन करून पालिकेच्या स्वायत्तेवर घाला घातला जात आहे. त्यामुळे नदी सुधारणेसाठी एसपीव्ही कंपनी स्थापन करण्याच्या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेत विरोध केला जाणार आहे.

केवळ 30 ते 40 टक्के पाण्यावरच प्रक्रिया
शहरात दररोज सुमारे साडेसातशे एमएलडी सांडपाणी निर्माण होते. त्यातील केवळ 30 ते 40 टक्के पाण्यावरच प्रक्रिया करून ते नदीत सोडले जाते, तर उर्वरित पाणी थेट नदीत सोडले जाते. मुळा-मुठा नद्या या सांडपाण्याच्या वाढत्या जलप्रदूषणामुळे मरणासन्न अवस्थेत आहेत. नद्यांची जैवविविधता संपुष्टात आली असून, देशातील सर्वाधिक प्रदूषित नद्यांमध्ये या नद्यांचा समावेश होतो. त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून जपानच्या जायका कंपनीच्या अर्थसाहाय्याने प्रकल्प राबविण्यात येत आहे.

44 किलोमीटरच्या पात्राचा विकास
पुणे, पिंपरी-चिंचवड, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डमधून वाहणार्‍या मुळा व मुठा या नद्यांचा सुमारे 44 किलोमीटरच्या पात्राचा विकास केला जाणार आहे. त्यासाठी स्पेशल पर्पज व्हेइकल कंपनी स्थापन केली जाणार आहे. त्यात महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेता, विरोधी पक्षनेते, दोन्ही पालिकांचे आयुक्त, विभागीय आयुक्त, खडकी कॅन्टोन्मेंटचे विशेष कार्याधिकारी, शहर अभियंता, मुख्य अभियंता, तज्ज्ञ यांचा समावेश असणार आहे.

या कंपनीत चार पक्ष नेत्यांचा समावेश करण्याची उपसूचनाही मान्य केली आहे. त्यामुळे या कपंनीच्या सदस्याची संख्या 15 झाली आहे. या कंपनीला नदीची जागा हस्तांतरित करण्यात येणार आहे. विविध माध्यमांतून निधी उपलब्ध करणे, विकसन प्रकल्पाचे देखभाल व दुरुस्तीचे अधिकार देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

कंपन्यांचा कारभार कळत नाही
नदी काठ आणि नदी प्रकल्प सुधारणाच्या कामासाठी खरोखर एसपीव्ही कंपनीची गरज आहे का? पीएमपीएल, स्मार्ट सिटी आणि आता नदी सुधारणा या कामासाठी एसपीव्ही कंपनी स्थापन करून पालिकेच्या स्वायत्तेवर घाला घातला जात आहे. एसपीव्ही कंपनी झाल्यानंतर स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेपुढे हे विषय मंजुरीसाठी येत नाहीत. त्यामुळे या कंपन्या काय कारभार करतात हे कळत नाही. त्यामुळे नदी सुधारणेसाठी एसपीव्ही कंपनी स्थापन करण्याच्या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेत विरोध केला जाणार असल्याचे काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी सांगितले.